पुणेकरांनो मच्छरदाणी वापरा; खिडक्यांना जाळ्या बसवा, डेंग्यूचा ‘ताप’ वाढतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 12:13 PM2023-07-27T12:13:54+5:302023-07-27T12:14:18+5:30
डास उत्पत्ती ठिकाणे आणि पाणीसाठे चांगले राहतील यावर नागरिकांनी लक्ष ठेवावे
पुणे : सततचा पाऊस, ढगाळ वातावरण, सडलेला कचरा यामुळे पुण्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूची साथ वाढत आहे. विशेषकरून जुलै महिन्यात जास्त वाढ झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत २४ जुलैपर्यंत ६२१ संशयित आणि ३३ निदान झालेले रुग्ण आढळले आहेत. संभाव्य धाेका टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे १० ते ४० कोटी नागरिकांना डेंग्यूचा संसर्ग होतो. त्यापैकी भारतात संख्या जास्त असते. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर डास असणारी ठिकाणे शोधून औषधांची फवारणी केली जाते. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यात आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन डेंग्यू, मलेरिया, जपानी मेंदूज्वर, लेप्टोस्पायरोसिस या आजारांबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. तसेच गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
जुलै महिन्यात १४९ संशयित
पुणे महापालिका हद्दीत पावसाळ्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढते. त्यामध्ये जुलैपासून तीव्रपणे वाढ होते. कारण सध्या संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जागोजागी पाणी साचत असून, त्यामध्ये डेंग्यूचे डास अंडी घालून पैदास वाढवत आहेत. त्यानुसार शहरात एकट्या जुलै महिन्यात १४९ संशयित रुग्ण आढळले. त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे.
या आहेत उपाययोजना
- परिसरात स्वच्छता ठेवा
- डासांपासून वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणी अन् डास प्रतिबंधक क्रीम वापरा
- खिडक्यांना जाळ्या बसवा
- घरात कोठेही पाणी साचू देऊ नका
- पाणी उघडे ठेवू नका
- आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा
रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयातील वॉर्ड सज्ज
डेंग्यू डास उत्पत्तीप्रकरणी आतापर्यंत ९७६ जणांना नोटिसा दिल्या आहेत. काही आस्थापनांकडून एक लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालयातील वॉर्ड सज्ज करण्यात आले आहेत. डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे आणि पाणीसाठे चांगले राहतील यावरही नागरिकांनी लक्ष ठेवावे. - डॉ. सूर्यकांत देवकर, प्रमुख साथरोग विभाग, पुणे मनपा