Pune Metro: पुणेकर लवकरच अनुभवणार मेट्रोच्या भुयारी मार्गाची सफर; बोगद्यांचे काम पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:29 PM2022-11-16T13:29:41+5:302022-11-16T13:36:12+5:30
शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग भुयारी
पुणे: शहराच्या मध्यवर्ती भागातील मेट्रोची भुयारी स्थानके ‘न्यू ऑस्ट्रियन टनेल मेथड’ने तयार करण्यात येत आहे. यात जमिनीच्या वर ४० गुणिले ४० मीटरचा एक चौकोन असेल, त्याच चौकोनातून थेट खाली २५ ते २८ मीटर खोलीवर १४० मीटर रुंदीचा मेट्रोच्या भुयारी स्थानकाचा फलाट (प्लॅटफॉर्म) असेल.
शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग भुयारी आहे. त्यातील स्वारगेट, मंडई व कसबा पेठ ही तीन स्थानके शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंतचे दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. आता मध्यवर्ती भागातील या तीनही स्थानकांची कामे सुरू आहेत. ती नव्या अत्याधुनिक पद्धतीने केली जात आहेत. मध्यवर्ती भागात स्थानकासाठी मिळणाऱ्या जागेची अडचण लक्षात घेऊन ही पद्धत उपयोगात आणली आहे.
असे असेल स्थानक
जमिनीच्या वर स्थानकाचा लहानसाच भाग असेल. फक्त ४० गुणिले ४० मीटरच्या चौकोनातून खाली स्थानकात जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची सोय केलेली असेल. त्यासाठी साधा जीना, सरकता जीना व लिफ्ट अशा तीन सुविधा आहेत. हाच चौकोन स्थानकापर्यंत गेल्यानंतर डावी-उजवीकडे प्रत्येकी ७० मीटर याप्रमाणे १४० मीटर असा रुंद झालेला असेल. हा असेल मेट्रोचा प्लॅटफॉर्म. त्याच्यावर एक मजला असेल. तिथे कॅफेट एरिया व प्रवाशांना तिकीट काढता येईल. त्याच्या वरील बाजू थेट रस्त्यावर खुली होईल.
स्वारगेटचे ७०, तर मंडईचे ६० टक्के काम
जाणारी व येणारी असे दोन्ही बोगदे भुयारी स्थानकात एकत्र होणार आहेत. प्लॅटफॉर्म संपला की ते पु्न्हा वेगळे होतील. स्थानकाच्या वरील बाजूस असणारा चौकोन जमिनीच्या खालपर्यंत थेट उजेड नेणारा मोकळा डक्ट असणार आहे. या पद्धतीत जमिनीखाली जाऊन नंतर दोन्ही बाजूंना आडवे खोदकाम करावे लागते. बोगद्यांच्या वरील बाजूस स्थानकाचा दुसरा मजला असल्याने त्यासाठी म्हणून हे खोदकाम होते. सध्या तीनही स्थानकांमध्ये हेच काम सुरू आहे. स्वारगेटचे ७० टक्के, मंडईचे ६० टक्के आणि कसबा पेठेतील ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.
''स्वारगेट, मंडई व कसबा पेठ (साततोटी हौद) या मेट्रोच्या तीनही भुयारी स्थानकांचे काम गर्दीच्या परिसरात करायचे होते. त्यामुळे ते आव्हानात्मक होते. आता ते काम झाले असून प्रत्यक्ष स्थानक बांधकामाला सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट या भुयारी मार्गाप्रमाणेच आता स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा भुयारी मार्गही लवकरच स्थानकांसह पूर्ण होईल. - डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो''