पुणे शहराचे अग्निशामक दल ‘यंत्र सामुग्रीने सुसज्ज पण मनुष्यबळात उणे’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 10:24 PM2020-11-30T22:24:00+5:302020-11-30T22:25:01+5:30
पुणे शहरातील नागरिकांचे विविध आपत्ती आणि संकटामधून रक्षण करणारे जवान संकटात आहेत.
पुणे : आग असो की पूर... भिंत पडो की इमारत... झाड कोसळो की डोंगर... सर्व ठिकाणी आपत्तीच्या काळात धावून जाणा-या अग्निशामक दलाच्या जवानांवर कामाचा ताण वाढला आहे. पुण्याची हद्द आणि लोकसंख्या गेल्या २० वर्षात ज्या प्रमाणात वाढली त्या प्रमाणात मात्र अग्निशामक दलाचे मनुष्यबळ आणि अग्निशामक केंद्रांची संख्या मात्र वाढलेली नाही. साधनसामुग्रीने सुसज्ज असलेले पुण्याचे अग्निशामक दलात मनुष्यबळाची मात्र वाणवा आहे.
शहरातील नागरिकांचे विविध आपत्ती आणि संकटामधून रक्षण करणारे जवान संकटात आहेत. दलाच्या जवळपास ५१० जागा रिक्त आहेत. यामध्ये ‘फायरमन’च्याच ३९० जागा आहेत. चालकांचीही कमतरता असून ऐनवेळेला पालिकेच्या व्हेईकल डेपोकडून कंत्राटी चालक अग्निशामक दलाला मागवावे लागतात. ‘फायर इंजिन’ चालविण्यात हे चालक वाकबगार नसल्याने अनेकदा अडचणी उद्भवतात. दलाच्या मदतीकरिता देण्यात आलेल्या देवदूतच्या गाड्याही कंत्राटी असून त्यावरील मनुष्यबळही कंत्राटी आहे. यासोबतच अलिकडच्या काळात मदतनीस चार-चार महिन्यांच्या मुदतीवर कंत्राटी पद्धतीने घेतले जात आहेत. परंतु, हा उपाय तात्कालीक ठरत असून यामुळे दलाच्या जवानांवरील ताण कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे.
===
१) शहरात एकूण १४ अग्निशामक केंद्र असून आणखी १२ केंद्रांची आवश्यकता आहे. गंगाधाम चौक, काळेपडळ आणि धानोरी येथील केंद्र बांधून तयार आहेत. तर, नाना पेठ, टिंगरेनगर, वडगाव बुद्रुक (सिंहगड रस्ता), न-हे येथेही केंद्रांसाठी जागा ताब्यात आहेत.
२. अग्निशामक दलाकडे आजमितीस ५१० पदे रिक्त असून ही पदे तात्काळ भरली जाणे आवश्यक आहे.
====
अग्निशामक दलाकडे आधुनिक साधन सामुग्री उपलब्ध आहे. लांब शिडीच्या आणि अत्याधुनिक ब्रँटो सारख्या वाहनांमुळे दलाची क्षमता वाढली आहे. पुरेसे टँकर, छोट्या-मोठ्या गाड्या, बंब, कर्मचा-यांसाठी सुरक्षा साधने, गणवेश, बूट, हातमोजे, हेल्मेट आदी साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. पालिकेने त्यावर कोट्यवधींचा खर्च केला. परंतु, त्याप्रमाणात मनुष्यबळ मात्र नाही.
====
चालू वर्षात पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात किरकोळ आणि गंभीर स्वरुपाच्या आग लागण्याच्या तसेच झाडपडी, घरपडी, भिंतपडी, पूर आदी विविध प्रकारच्या ७५० घटना अग्निशामक दलाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. या घटनांची माहिती मिळताच दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत नागरिकांची मदत केली.
====
२०१४ साली महापालिकेच्या विविध विभागांच्या पदांचे रोस्टर तयार झाले. शासनाने संपुर्ण राज्यातील अग्निशामक दलाची पदे वगळून सर्व पदांना मान्यता दिली. दलाच्या पदांसाठी आवश्यक शिक्षण व पदोन्नतीबाबत पॉलिसी ठरविण्यात येणार होती. शासनदरबारी हे रोस्टर प्रलंबित असल्याने नवीन भरती करता येत नाही. तसेच, पदोन्नतीही देता येत नाही. आजमितीस शहरात तीन केंद्र बांधून तयार आहेत. परंतु, मनुष्यबळ नसल्याने ते सुरु करता येत नाहीत.
- प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशामक दल