पावसाने पुणे शहर जलमय; महापालिकेकडे ७१ तक्रार कॉल
By निलेश राऊत | Published: September 16, 2022 08:03 PM2022-09-16T20:03:57+5:302022-09-16T20:06:14+5:30
कोणालाही स्थलांतरीत करण्याची गरज नाही : महापालिकेची माहिती
पुणे : शहरात सर्वच भागात सुरू असलेल्या पावसाने शहर जलमय केले. खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस झाल्याने, मुठा नदीत ३० हजार क्युसेक्स वेगाने पाणी साेडले गेल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला असला तरी, अद्याप पर्यंत कोणालाही स्थलांतरित करण्याची गरज भासली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश सोनुने यांनी दिली.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह क्षेत्रीय कार्ययालयांतील कक्षाकडे दिवसभरात ७१ कॉल आले आहेत. यामध्ये घरात, वस्तीत, साेसायटीमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी आहेत. शहरात सात झाड पडीच्या घटना घडल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाणी साचलेल्या, गटर तुंबलेल्या ठिकाणी तसेच पाणी साचल्याच्या ठिकाणी कार्यवाही करून पाण्याला वाट करून दिली आहे. शहरात आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात चाेवीस तास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षांमध्ये दहा उप अभियंते, आरोग्य निरिक्षक आदींचा समावेश आहे. तसेच एक जेसीबी, एक जेटींग मशिन, एक ट्रक, पंचवीस जणांचे मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
नदी पात्रालगतच्या भागातील काेणालाही स्थलांतरीत करण्याची गरज भासली नसली तरी, खबरदारीचा उपाय म्हणून पाण्यामुळे बाधित होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांसाठी ३९ शाळांमध्ये तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पावसामुळे मोठ्या प्रमाणात बाधित झालेला भाग
सिंहगड रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे
कोथरूड येथील मुंढे वस्ती टेबल स्टू येथे ओढ्याला पूर
कोंढवा येवलेवाडी येथील टायनी इंडस्ट्रीज येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले
येरवडा येथील अमृतेश्वर मंदिर येथे घरांमध्ये पाणी शिरले
चांदणी चौकातील फासा सोसायटीमध्ये पाणी शिरले.
खडड्यामुळे वाहतुक संथगतीने
शहराच्या मध्यवर्ती भागाला व डेक्कन भागाला जाेडणारा भिडे पुल हा पाण्याखाली गेला असल्याने, परिसरात मोठी वाहतुक कोंडी झाली होती. नदीकाठचा रस्ता बंद झाल्याने केळकर रस्ता, जंगली महाराज रस्ता आदी रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढल्याने, या परिसरात मोठी वाहतुक कोंडी दिवसतरात दिसून आली. त्यातच आधीच खड्डेमय झालेल्या शहरातील अनेक रस्त्यांवर पडलेल्या खड्डयात पाणी साठले हाेते. यामुळे सर्व भागातील वाहतुकीची गती संथ झाली हाेती.