देशातील सर्वाधिक जैवविविवधतेचे शहर पुणे; ५०० वृक्षजातींची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:22+5:302021-05-22T04:09:22+5:30
पुणे : पुणे हे भारतातील सर्वाधिक जैवविविधता असलेले शहर आहे. पुण्यातील वृक्षजातींची एकूण संख्या सुमारे ५०० इतकी आहे. विशेष ...
पुणे : पुणे हे भारतातील सर्वाधिक जैवविविधता असलेले शहर आहे. पुण्यातील वृक्षजातींची एकूण संख्या सुमारे ५०० इतकी आहे. विशेष म्हणजे त्यापैकी अंदाजे ५० टक्के म्हणजे २५० च्या आसपास जातीसंख्या एतद्देशीय (भारतीय) झाडांची आहे. पुणे परिसरात मोठ्या संख्येने येथील मूळ रहिवासी असलेल्या वृक्षप्रजातींचे वृक्ष आहेत. त्यातील कितीतरी आपोआप म्हणजे नैसर्गिकरीत्या वाढलेली आहेत, अशी माहिती ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांनी दिली.
पुण्याच्या भूरचनेची एक खासीयत म्हणजे भोवताली असलेल्या लहानमोठ्या टेकड्या. त्यातील काहींच्या पठारांवर आणि उतारावर बऱ्यापैकी झाडोरा अस्तित्वात आहे. पर्वती पाचगाव वनविहार आणि भांबुर्डा वनविहार ही वनविभागाने राखलेली विस्तृत हरितक्षेत्रे पुण्याची जणू फुप्फुसेच आहेत. सह्याद्रीच्या मुख्य रांगापासूनचे सुयोग्य अंतर, पर्जन्यछायेच्या प्रदेशात असूनही पाण्याची मुबलकता, अनेक भागांत काळी कसदार जमीन आणि उदंड भूजल उपलब्धता ही पुण्याची काही निसर्ग बलस्थाने आहेत, अशी माहिती महाजन यांनी दिली.
—————————-
मध्य हिमालयातील सरल वृक्ष किंवा पाइन पुण्यात छान वाढलाय. कोकण किनाऱ्यावरील सुवासिक फुलांचा देखणा वृक्ष उंडी आणि राजस्थानचा कल्पतरू खेजडी तथा शमी हे सुद्धा पुण्यात डौलाने फुलत आहेत.
परदेशी वृक्षांची मोठी संख्या पुण्यात आहे. त्यात गुलमोहोर, नीलमोहोर, सिल्व्हर ओक, निलगिरी, बूच, पर्जन्यवृक्ष, सुरू, सुबाभुळ, पांढरा चाफा, बाॅटल ब्रश, महोगनी, कॅशिया, टॅबेबुईया अशा ४२ हून अधिक परदेशी प्रजाती पुण्यात फुलत आहेत.
विदेशी दुर्मीळ वृक्ष पुण्यात आहेत. यात गुलाबी सावर, दिल्ली सावर, ऊर्वशी, बेगर्स बाऊल, आॅस्ट्रेलियन चेस्टनट, बरसेरा, ब्लड वुड ट्री, काॅलव्हिल्स ग्लोरी, टॅबेबुईया अॅव्हेलॅनेडी आणि पामच्या कितीतरी जाती यापैकी एकदोनच पुण्यात आहेत.
——————————
पुण्याचे वैशिष्ट्यपूर्ण सोनसावर
पुण्याचे एक वैशिष्ट्यपूर्ण झाड म्हणजे सोनसावर आहे. हे पुण्यातील टेकड्यांवरच दिसते. इतर कुठेही पाहायला मिळत नाही. या झाडाला गणेर, गडबी, गलेरी अशीही स्थानिक नावं आहेत. हा अस्सल भारतीय असून, शिवालिका पर्वतरांगापासून बिहार, ओरिसा, आसाम, मध्यप्रदेश या प्रदेशात तुरळक आढळतो. महाराष्ट्रातही कमीच आहे. पण पुण्याच्या टेकड्यांवर मात्र सोनसावर भरपूर आहे. संरक्षण खात्याच्या हद्दीत तर सुमारे २०० झाडांची नोंद आम्ही काही वर्षांपूर्वी केली होती, असे महाजन यांनी सांगितले.
————————————