पुणे-नगर महामार्गावर नित्याचीच झाली वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 09:08 PM2018-04-28T21:08:18+5:302018-04-28T21:08:18+5:30
सर्व्हिस रस्त्याचा अभाव, चौका-चौकांमध्ये बेकायदा उभी असलेली वाहने, स्थानिकांची वाहने,अवजड वाहने,विरुद्ध दिशेने येणारी वाहने, आठवडे बाजारामुळे या ररस्त्यावर वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे.
कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गाचे चौपदरीकरण झाले. मात्र सर्व्हिस रस्ता, बेकायदा पार्किंग, सिग्नल बसवूनही वापराविना धूळखात पडले असल्याने या मार्गावर वाघोली, कोरेगाव भीमा, सणसवाडी व शिक्रापूर याठिकाणी वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. शनिवारी सकाळीच वाहतूककोंडी झाल्याने तसेच कोंडी सोडवण्यासाठी पोलीस कर्मचारी नसल्याने या कोंडीत अडकलेले माजी आमदार अॅड. अशोक पवार यांनी स्वत: वाहनातून उतरुन वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केला.
पुणे-नगर महामार्गाचे २००५मध्ये ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर चौपदरीकरण करण्यात आले. या रस्त्याचे नूतनीकरणही करण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी रस्ता अरुंदच ठेवण्यात आला. त्यात सर्व्हिस रस्त्याचा अभाव, चौका-चौकांमध्ये असणारी बेकायदा उभी असलेली वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, वाघोलीतील स्थानिकांची वाहने, आव्हाळवाडी-भावडीकडे जाणारी अवजड वाहने, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, त्यात कोरेगाव भीमा येथील आठवडे बाजारामुळे या ररस्त्यावर वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. सणसवाडी-कोरेगाव भीमा व रांजणगाव एमआयडीसीमुळे औद्योगिकीकरणात व पर्यायाने नागरीकरणात मोठी वाढ झाली. त्यातच पुणे-नगर महामार्गावरुन पुढे औरंगाबाद, नागपूर, धुळे-जळगाव, अमरावती, तसेच बुलडाणा, बीड याठिकाणी या रस्त्यावरुन जाणे सोपे असल्याने ट्रॅव्हल्समध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने चौपदरीकरण असूनही हा रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे.
हा रस्ता तयार झाल्यानंतर काही वर्षांतच या रस्त्यावर वाघोली ते शिक्रापूर उड्डाणपुलासह रस्त्याचे नूतनीकरणाचा प्रस्ताव समोर येऊन अडीच हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला. मात्र यासाठी एवढा मोठा निधी टाकणे शक्य नसल्याने हा प्रस्तावही बारगळला. त्यात शिरुर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी हा रस्ता हायब्रिड अॅमीनिटीमध्ये घेतला असल्याचे व ४६५ कोटी रुपये मंजूर झाल्याची केलेली घोषणा हवेतच विरली गेली. त्यातच पुढे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याचे सांगण्यात येत असूनही अद्याप हा रस्ता नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या सर्व कारणांमुळे वाघोली, कोरेगाव भीमा, सणसवाडीसह शिक्रापूर (ता. शिरूर) याठिकाणी दररोज सकाळपासून सायंकाळी ७ ते ८ पर्यंत वाहतूककोंडी होत असते. या रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्वत: पुढाकार घेत दर महिन्यास सर्व शासकीय विभागांच्या बैठकांचे आयोजन केले. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे हाही उपाय बारगळला. नित्याच्याच वाहतूककोंडीत सलग चार दिवस सुट्यांमुळे गावाकडे जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने पुणे-नगर महामार्गावर शनिवारी पहाटेपासून या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. आज बी.एड. विभागाच्या परीक्षा असल्यामुळे परीक्षार्थी, विद्यार्थी ,रुग्णवाहिकादेखील वाहतूककोंडीत अडकल्या. पोलीस कर्मचारी हजर नसल्याने शिरुर-हवेलीचे माजी आमदार व घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी स्वत: वाहनातून उतरुन वाहतूककोंडी सोडविली. या वेळी संचालक दिलीप मोकाशी, काकासाहेब चव्हाण, संतोष चौरशिया यांच्यासह असंख्य तरुणांनी पुढे येत वाहतूक सुरळीत करण्यास पुढाकार घेतला.
प्रशासनावर आमदारांचेच लक्ष नाही...
शिरुर-हवेलीचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांचा पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडीवर लक्ष नाही. प्रशासनावरही वचक नसल्याने वाहतूककोंडी सुटत नसल्याने या कृत्रिम वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, रुग्णवाहिका, परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह कामगारवर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनास जाग येणार की नाही? असा सवाल शिरुर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी केला.
विद्यार्थ्यांना सोडवायला माजी आमदारांची गाडी
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाहतूककोंडीत परीक्षार्थी विद्यार्थ्यांचेही वाहन अडकले होते. त्यातील एका महिलेने माजी आमदार अशोक पवार यांच्याकडे वाहन अडकल्याची व बी.एड.च्या परीक्षेस उशीर होत असल्याचे सांगितले. पवार यांनी स्वत:च्या वाहनातून दिलीप मोकाशी यांना सदर परीक्षार्थी मुलींना परीक्षा केंद्रावर पाठवून दिले.