Pune Corona: उच्चांकाच्या तुलनेत सलग तिस-या दिवशी रुग्णसंख्येत घट; पुणेकरांना काहीसा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 08:06 PM2022-01-25T20:06:18+5:302022-01-25T20:06:26+5:30
शहरात २० आणि २१ जानेवारी रोजी कोरोनाबाधितांच्या संख्येने आजवरचा उच्चांक गाठत पुणेकरांच्या चिंतेत भर घातली होती
पुणे : शहरात २० आणि २१ जानेवारी रोजी कोरोनाबाधितांच्या संख्येने आजवरचा उच्चांक गाठत पुणेकरांच्या चिंतेत भर घातली होती. मात्र, गेले तीन दिवस रुग्णसंख्या कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी दिवसभरात १३ हजार २२५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ५ हजार २७१ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे़ मात्र, पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ झाली आहे. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ३९.८५ टक्के इतकी आहे़ दिवसभरात ६ हजार २९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ४५ हजार २६७ झाली असून, आज १२ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ५ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ४३ जणांवर इनव्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर, ३० जणांवर नॉन इनव्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. ३४९८ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ३.३० टक्केच रुग्णांना रुग्णालयात उपचाराची गरज भासली आहे.
शहरात आत्तापर्यंत ४२ लाख ६७ हजार ७३२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ६ लाख १५ हजार २७ जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ५ लाख ६० हजार ५५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार २०६ जणांचा मृत्यू झाला आहे.