कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुणे शहरासाठी महापौर निधीतून मिळाल्या आणखी नऊ रुग्णवाहिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:56 PM2021-04-24T23:56:52+5:302021-04-24T23:59:27+5:30
कोविड उपचारांसाठी निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करीत होती. दुसऱ्या लाटेचा मुकाबला सुद्धा पालिका सक्षमपणे करीत आहे. आरोग्य तंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. महापौर निधीमधून देण्यात आलेल्या नऊ रुग्णवाहिका त्याचाच भाग असल्याचे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.
महापौर निधीमधून शहरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या नऊ रुग्णवाहिकांमध्ये २ अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिका, २ रुग्णवाहिका आणि ५ शववाहिकांचा समावेश आहे. या वेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शहर सुधारणा समिती अध्यक्ष आनंद रिठे, क्रिडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
महापौर म्हणाले, 'कोरोनाची साथ पुणे शहरात आल्यापासून कोरोना निर्मूलन आणि उपाययोजना करण्यासाठी एक निधी कमी पडू दिला नाही. आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी कोणतीही तडजोड करणार नाही.
----
शहरात गेल्या पाच दिवसांत नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे सक्रिय रुग्णसंख्या घटत चालली आहे. पुणेकरांनी ढिलाई करु नये, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले.