पुणे - नगर रस्त्यावर अपघाताचा थरार; भरधाव वेगात टँकरची ३ मोटारींना धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 03:27 PM2023-08-20T15:27:15+5:302023-08-20T15:27:52+5:30
काही तरूणांनी धाडसाने या टॅंकरचालकाला पकडले असून, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले
शिरूर: पुणे - नगर रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या टॅंकर चालकाने सरदवाडी ते शिरूर दरम्यान, तीन मोटारींना धडक दिली. शनिवारी रात्री आठ च्या सुमारास हा थरार घडला. सुदैवाने या प्रकारात जिवीतहानी झाली नसली; तरी मोटारींचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. शिरूर बायपास जवळ काही तरूणांनी धाडसाने या टॅंकरचालकाला पकडले असून, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
राम ज्ञानोबा कबनुरे (रा. नळेगाव, जि. लातूर) असे मद्यधुंद टॅंकर चालकाचे नाव असून, त्याला शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. कबनूरे हा पुण्याहून नगरच्या दिशेने ऑईल ने भरलेला टॅंकर घेऊन नगरच्या दिशेने जात होता. सरदवाडीजवळ त्याने प्रथम मारूती अल्टो मोटारीला बाजूने ठोकरले. तशाच अवस्थेत पुढे जात पुढे जाणाऱ्या वॅगन आर मोटारीला मागून धडक दिली. या धडकेने वॅगन आर रस्त्याच्या खाली गेल्यावर भरधाव वेगातील टॅंकर तसाच पुढे निघून गेला. या धडकेत मोटारचालक भगवान शिंदे (रा. शिरूर) यांच्या मानेला हिसका बसला व स्टेअरिंग वर आदळल्याने छातीला मुका मार लागला.
पुढे बोऱ्हाडे मळ्याजवळ रस्त्याकडेला एका छोटेखानी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या के टेन मोटारीला जोराची धडक दिली. या धडकेने मोटार समोरील झाडावर जाऊन आदळल्याने दोन्ही बाजूंनी चेपली. या धडकेत मोटारीचा चक्काचूर झाला. मोटारचालक किशोर तबाजी थोरात (रा. जुने शिरूर) हे चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेले असल्याने सुदैवाने बचावले. या प्रकारानंतर स्थानिक तरूणांनी व येथील एका मोटारीच्या शोरूममधील तरूणांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळविली व त्यांनीही टॅंकरचा पाठलाग केला. शिरूर गावाबाहेरून (बायपास) जाणाऱ्या पुणे - नगर रस्त्यालगत धाडसाने टॅंकर थांबवून चालकाला ताब्यात घेतले व पोलिसांच्या हवाली केले. रात्री उशिरापर्यंत त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम शिरूर पोलिस ठाण्यात चालू होते. दरम्यान, याच टॅंकर चालकाने पुण्याहून येताना सणसवाडी जवळही दोन मोटारींना ठोकरल्याचे समजते. शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या आवारात तशी चर्चा होती. तथापि, रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्यास कुणीही फिरकले नसल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.