पुणे शहर होणार सोलर सिटी
By admin | Published: April 29, 2017 04:27 AM2017-04-29T04:27:21+5:302017-04-29T04:27:21+5:30
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सोलर सिटी योजनेत पुणे शहराची निवड करण्यात आली असून, त्याची पूर्वतयारी म्हणून महापालिकेच्या
पुणे : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सोलर सिटी योजनेत पुणे शहराची निवड करण्यात आली असून, त्याची पूर्वतयारी म्हणून महापालिकेच्या वतीने या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. केंद्र सरकारचे आपारंपरिक ऊर्जा मंत्रालय व महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांमधून पुणे शहरात सौर ऊर्जेपासून जास्तीतजास्त वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. किमान २० ते ३० टक्के वीज बचत यातून व्हावी असा उद्देश ठेवून हे काम करण्यात येणार आहे.
विजेची वाढती गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालयही स्थापन करण्यात आले आहे. सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीला यात प्राधान्य देण्यात आले असून, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी म्हणून या मंत्रालयापासून अनुदानही देण्यात येते. सुरुवातीच्या काळात सोसायट्या तसेच उद्योगसमूह यांच्या मदतीने असे प्रकल्प तयार केल्यानंतर आता संपूर्ण शहरच सौरऊर्जेचा जास्तीतजास्त वापर करेल यादृष्टीने सोलर सिटी योजना सुरू करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची यासाठी मदत घेण्यात येत आहे. या योजनेत पुणे शहराला सामावून घेण्यात आले आहे. महापालिकेवर त्यासाठीचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सौर ऊर्जानिर्मितीसाठी उन्हाचा वापर करण्यात येतो. मोठी पॅनेल त्यासाठी तयार करावी लागतात. त्याला बरीच जागा लागते. तयार झालेली वीज लगेचच वापरावी लागते. पॅनेल तयार करण्याचा खर्च बराच असला तरी एकदा पॅनेल तयार झाली की त्यापासून सातत्याने वीजनिर्मिती होत राहते. पॅनेलच्या दुरुस्तीशिवाय दुसरा खर्च यासाठी येत नाही.
महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता श्रीकृष्ण चौधरी यांनी सांगितले, की महापालिकेने सुरुवातीपासून वीज बचत करण्यावर भर दिला आहे. सोलर सिटी या योजनेत पुणे शहराची निवड झाल्यानंतर केंद्र सरकारने यासंबंधीचा अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे काम सुरू आहे. या योजनेतून किमान २० टक्के वीजबचत झाली तरीही महापालिकेचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सुरुवातीस महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांना यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. तिथे अशी वीजनिर्मिती झाली तर त्या कार्यालयांमधील विजेच्या सर्व उपकरणांसाठी ही वीज वापरता येईल. (प्रतिनिधी)