पुणे शहराला तुफान पावसाने मध्यरात्री झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 12:19 PM2019-09-24T12:19:15+5:302019-09-24T14:10:45+5:30
काही तासात ५५.९ मिमी पाऊस : वडगाव शेरीत सीमा भिंत कोसळली...
पुणे : गेल्या चार महिन्यापासून सुरु असलेल्या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली होती़. पण, मध्यरात्री काही तासात पडलेल्या तुफान पावसाने शहराला झोडपून काढले़. पहाटे शहरात पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले होते़. काही ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी शिरले़. वेधशाळेत ५५.९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली़. हवामान विभाग दर ३ तासांनी पावसाची नोंद घेते़. मध्यरात्री साडेअकरा वाजेपर्यंत पावसाने शुन्य नोंद होती़. त्यानंतर सकाळपर्यंत तब्बल ५५.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. मध्यरात्रीनंतर अचानक आकाशात ढग दाटून आले़. त्यानंतर जोरदार पावसाची सुरुवात झाली़. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते़. पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोरील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते़. वडगाव शेरी रामवाडी गावातील डिसेंट सोसायटीची सीमा भिंत या मुसळधार पावसाने कोसळली़. कोंढव्यातील सोसायटीत ड्रेनेजचे पाणी शिरले़. अनेक सोसायट्यांमध्ये रस्त्यावरील पाणी शिरल्याच्या घटना घडल्या़.पुणे शहरात आज सकाळपर्यंत १ जूनपासून तब्बल ९३० मिमी पावसाची नोंद झाली आहे़. अजून पावसाळ्याचे काही दिवस शिल्लक असून उतरतीचा पाऊस अद्याप सुरु झाला नाही़. त्यामुळे पुढील काही दिवसात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.पावसाळ्यातील गेल्या १० वषार्तील हा सर्वाधिक पाऊस आहे़. २००५ मध्ये चार महिन्यात ११६३ मिमी पावसाची नोंद झाली होती़. २००० सालानंतर चार महिन्यात सर्वाधिक पाऊस झाल्याचे हे दुसरे वर्ष आहे.