पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करणार; '३२ गाव कृती समिती'चा महापालिका प्रशासनाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 20:44 IST2025-03-13T20:41:35+5:302025-03-13T20:44:32+5:30
Pune News: कृती समितीचे राहुल पोकळे आणि रमेश बापू कोंडे यांनी शासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा पुणेकरांना येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला.

पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करणार; '३२ गाव कृती समिती'चा महापालिका प्रशासनाला इशारा
-सलीम शेख, शिवणे
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये टॅक्स विषय अत्यंत गंभीर बनला आहे. आता ३२ गावं कृती समितीने पुणे महापालिका प्रशासनाला पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशावर महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
३२ गाव कृती समितीने यापूर्वी 'गाव विकणे आहे' अशा घोषणांपासून विविध आंदोलनं करण्यात केली आहेत.
प्रकरण काय, कृती समिती आक्रमक का झालीये?
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी महापालिकेला आदेश दिला होता की, ग्रामपंचायतीच्या धरतीवर दुपटीने कर आकारून तात्काळ पुनर्विलोकन करावे. मात्र, पुणे महापालिकेकडून आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या विलंबामुळे संतप्त झालेल्या ३२ गाव कृती समितीने मार्च अखेरपर्यंत आदेशाची अंमलबजावणी न केल्यास खडकवासला धरण क्षेत्रातील गावे पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आंदोलन छेडतील, असा इशारा दिला आहे.
या गावांना कोणताही निधी मिळालेला नाही, विकासकामे ठप्प आहेत, तरीही सक्तीने टॅक्स वसूल केला जात आहे. त्यामुळे या अन्यायकारक धोरणाविरोधात गावांमध्ये तीव्र नाराजी आहे.
बैठकीत कृती समितीचे राहुल पोकळे आणि रमेश बापू कोंडे यांनी शासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा पुणेकरांना येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला.
यावेळी कृती समितीचे राहुल पोकळे, रमेश बापू कोंडे,अरुण दांगट, सुभाष नाणेकर, नितीन दांगट, राहुल पायगुडे, संजय धावडे, अतुल दांगट नेताजी बाबर, मारुती किंडरे, महादेव धावडे, पोपटराव खेडेकर, अविनाश लगड, रमेश करंजावणे, अनिता इंगळे, विकास दांगट, शेखर मोरे, महेंद्र दांगट, बाळू दांगट, उमेश सरपाटील, सचिन दांगट, सुभाष शिंदे, रुपेश घुले, शेखर वाल्हेकर, अनिल वांजळे, सुरेंद्र कामठे, बाळासाहेब मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.