पुणे बंद! ते ठीक हाय; पण हातावर पोट असणाऱ्यांचे काय...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 09:12 AM2022-12-13T09:12:24+5:302022-12-13T09:18:16+5:30
पुणे बंदबरोबरच मूक मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे
पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून आज पुणे बंद पाळण्यात येत आहे. बंदबरोबरच आता मूक मोर्चाचेही आयोजन केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांबरोबरच संभाजी ब्रिगेड व अन्य अनेक सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी महासंघ, गणेशोत्सव मंडळे, यांनी पुणे बंदला पाठिंबा जाहीर दिला आहे. परंतु या एक दिवसाच्या बंदमुळे हातावर पोट असणारे गरीब, मजूर यांचे काय होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या दोन वर्षात या मजुरांनी खूप काही वेतना सहन केल्या आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचे जगणेच कठीण झाले होते. त्यावेळी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मजुरांच्या पोटापाण्याची सोय केली. परंतु अशा राजकीय घडामोडींवर शहरे बंद होयला लागली. तर उद्योगधंदे आणि व्यवसाय या बरोबरच गरिबांचेही नुकसान होत आहे. दररोज सकाळी हे मजूर शहराच्या विविध चौकात थांबलेले असतात. आज दिवसभरात काही काम मिळेल का? याचीही त्यांना शाश्वती नसते. एका दिवस मिळणाऱ्या मजुरीवरच ते नेहमी पोट भरतात. पण अशा होणाऱ्या नेहमीच्या बंदमुळे या मजुरांनी काय करावं? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. सामान्य माणूस एक दिवससुध्दा उपाशी राहू शकत नाही. मग या मजूर आणि गरिबांनी कोणता गुन्हा केलाय, कि त्यांच्यावर एक दिवस पोट मारण्याची वेळ आता आली आहे.
आज साकळपासूनच शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे. पुणे बंदमध्ये असंख्य संस्था सहभागी झाल्या आहेत. तसेच व्यापारी महासंघाने याला जाहीर पाठींबा दिला आहे. परंतु खरंच पुणे बंद करून सरकार वक्तव्य केलेल्यांची दखल घेणार आहे का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पुणे बंदमध्ये यांचाही असणार सहभाग
छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसेच राज्यातील अन्य नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली. तसेच गणेश मंडळांचा पाठिंबा आहे.