पुण्यात हुडहुडी; यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 09:43 AM2020-01-17T09:43:13+5:302020-01-17T09:43:20+5:30
पुणे शहरात हुडहुडी भरायला लावेल, अशी थंडी शुक्रवारी पहाटे पहायला मिळाली आहे.
पुणे : या हंगामात प्रथमच पुणे शहरात हुडहुडी भरायला लावेल, अशी थंडी शुक्रवारी पहाटे पहायला मिळाली आहे. शुक्रवारी सकाळी शहरात किमान तापमान ८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच शहरातील तापमान हे १० अंशाच्या खाली गेले आहे. एकाच दिवसात ४ अंश सेल्सिअसने पारा घसरून यंदाच्या हंगामातील निच्चाकी तापमानाची नोंद शुक्रवारी झाली आहे.
गुरुवारी शहरातील किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. गुरुवारी रात्रीपासून गारठा वाढला असल्याचे जाणवत होते. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिवस होता. अंगाला झोंबणारे थंडगार वारे यामुळे प्रत्यक्षात तापमानापेक्षा अधिक थंड जाणवत होते. शुक्रवारी सकाळी आकाशात दाट धुके पसरलेले दिसत होते. काही अंतरावरील दिसत नव्हते. सकाळी फिरायला जाणाऱ्या सर्वांनीच मफलर, स्वेटर घालून बाहेर पडले असल्याचे दिसत होते. सकाळी ९ वाजले तरी हवेतील गारठा जाणवत आहे.
नाशिक येथेही पारा घसरला आहे. नाशिकमध्ये ६ अंश सेल्सिअस, निफाडमध्ये २.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे. दुसरीकडे विदर्भातील किमान तापमानात मात्र वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.