पुणे थंड! शहरात ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; राज्यात गुलाबी थंडीची चाहूल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 09:00 PM2022-11-21T21:00:23+5:302022-11-21T21:00:37+5:30
राज्यात अनेक ठिकाणी तापमान १० अंशांच्या जवळ आहे
पुणे : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी पुणे व जळगाव येथे तापमान १० अंशांच्या खाली उतरले असून राज्यात अनेक ठिकाणी तापमान १० अंशांच्या जवळ आहे. त्यामुळे थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सोमवारी जळगाव येथे ८.२ तर पुण्यात ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मंगळवारीही अशीच थंडी राहून चार पाच दिवसांनंतर यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडून येणारे थंड वारे, कोरडे वातावरण तसेच आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण यामुळे राज्यात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असून मंगळवारीही थंडी अशीच असेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढून बुधवारनंतर राज्यात किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होईल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “राज्यात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असली तरी अनेक ठिकाणी तापमान १० अंश किंवा त्यापेक्षा जास्त आहे. केवळ पुणे व जळगावचा अपदाव वगळता अन्यत्र तापमान १० अंशांच्या पुढे आहे. पुण्यातही शिवाजीनगर वगळता शहराच्या अन्य भागात तापमान १० अंशांपेक्षा जास्त आहे. तापमान १० च्या खाली सलग दोन दिवस राहिल्यास थंडीची लाट आली असे म्हटले जाते. मात्र, तशी परिस्थिती सध्या नाही.”
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील काळ्या मातीतून रात्री निघणारे दीर्घ विकिरण वातावरणात शोषले जात नसल्याने किमान तापमान घसरले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने वातावरणात आर्द्रताही नाही. त्यामुळे वातावरण कोरडे आहे. आता मॉन्सूननंतरचा दुसरा महिना सुरू झाला आहे. हा थंडीचा मुख्य महिना असल्याने थंडीचा प्रभाव जाणवत आहे. मात्र, बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन चार दिवसांत आर्द्रता वाढणार आहे. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होईल. मात्र, त्यानंतर किमान तापमान आणखी वाढेल, असेही ते म्हणाले.
राज्यात सोमवारी ८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरी किमान तापमानापेक्षा ते ६.३ अंशांनी कमी होते. त्याखालोखाल कमी तापमान पुण्यात ८.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सरासरीपेक्षा ते ५.५ अंशांनी कमी होते. राज्यातील बहुतांश शहरांमधील कमाल तापमानातही सरासरीपेक्षी ३ अंशांपर्यंत घसरण झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान
पुणे ८.८, नगर १०.१, जळगाव ८.२, कोल्हापूर १४.८, महाबळेश्वर १०.४, नाशिक ९.२, सांगली १२.५, सातारा १३., सोलापूर १२.७, मुंबई २०.९, अलिबाग १६.३, रत्नागिरी १७.२, डहाणू १६.५, औरंगाबाद ८.९, परभणी ११, नांदेड १२.६, अकोला १२, अमरावती ११.७, बुलढाणा ११.६, चंद्रपूर १३.२, गोंदिया १०.५, नागपूर ११.४, वाशिम १३.२, वर्धा १२.२