पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानेच घेतला कोरोनाचा धसका; महिला कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 08:27 PM2020-07-08T20:27:13+5:302020-07-08T20:41:32+5:30
गेल्या एक महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यालये नियमित सुरू झाली देखील होती.
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावरील पुनर्वसन कार्यालयात एक महिला कर्मचारी चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयानेच कोरोनाचा धसका घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांवर अनेक निर्बंध घातले असून, कर्मचारी व येणाऱ्या नागरिकांची उपस्थिती खूपच कमी झाली आहे. तसेच पुनर्वसन कार्यालयाला देखील कुलुप लावण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात देखील अत्यंत झपाट्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. पंरतु शासनाच्या आदेशानुसार आता "बिगेन आगेन" अंतर्गत सर्व सरकारी कार्यालये, उद्योग, धंदे व अन्य सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरुळीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या एक महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यालये नियमित सुरू झाली देखील होती. परंतु शनिवार (दि.4) पुनर्वसन कार्यालयातील एक महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील चित्रच बदलले आहे. पुनर्वसन कार्यालयातील पॉझिटिव्ह महिला कर्मचारी यांच्या संपर्कातील 9 कर्मचारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शासनाने सर्व सरकारी कार्यालये नियमित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हाधिकारी यांनी देखील एखादा रुग्ण आढळून आल्यास संबंधित आस्थापना बंद करू नयेत असे स्पष्ट केले. परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयातच केवळ एक रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण पुनर्वसन कार्यालयच बंद झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद केले असून, नागरिकांच्या कार्यालयात येण्यावर निर्बंध घातले आहेत. अत्यंत कडक चेकअप करूनच जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्यात आले आहे.