पुण्याच्या कंपनीने शोधले रसायनमुक्त जंतुनाशक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 05:11 AM2020-04-05T05:11:18+5:302020-04-05T05:12:12+5:30
या द्रावणाच्या प्रयोगशाळेतील तपासण्या पूर्ण झाल्या असून, कंपनीला उत्पादन परवानाही प्राप्त झाला आहे.
हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पुण्यातील स्टार्टअप कंपनी ‘वुईइनोव्हेट बायोसोल्युशन्स’ने रसायनमुक्त जंतुनाशकाचा शोध लावला आहे. केंद्र सरकारच्या साह्याने हे संशोधन करण्यात आले आहे. हे जंतुनाशक कोविड-१९ साथीचा मुकाबला करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शोधण्यात आलेले जंतुनाशक अल्कोहोलमुक्त द्रव स्वरूपातील ‘कोलॉयडल सिल्हर सोल्युशन’ आहे. हात आणि पर्यावरणीय पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ते उपयुक्त आहे. हे द्रावण जळजळमुक्त आणि घातक रसायनविरहित आहे. प्रभावी सॅनिटायझर म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, या द्रावणाच्या प्रयोगशाळेतील तपासण्या पूर्ण झाल्या असून, कंपनीला उत्पादन परवानाही प्राप्त झाला आहे.
‘वुईइनोव्हटिव्ह बायोसोल्यूशन्स’चे एक संस्थापक डॉ. मिलिंद चौधरी यांनी सांगितले की, प्राथमिक पातळीवर दररोज २00 लिटर ‘कोलॉयडल सिल्व्हर सोल्यूशन’चे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. संसर्ग कमी करून भारताला संसर्गमुक्त करण्यास साह्य करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.
केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी या संशोधनास अर्थसाह्य केले आहे. नव्या जंतुनाशकाची माहिती सरकारने आजच आपल्या अधिकृत पोर्टलवर टाकली. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी एक निवेदन जारी करून नव्या संशोधनास पाठबळ दिले आहे.
जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, हे जंतुनाशक चांदीच्या नॅनो कणांपासून बनविण्यात आले आहे.
हे कण एचआयव्ही, हेपॅटायटीज बी, हेर्पेज सिम्प्लेक्स, एन्फ्ल्यूएंझा अशा घातक विषाणूंचा बीमोड करतात. ‘कोलॉयडल सिल्व्हर’ बनविण्यासाठी भारतीय
पेटंटही सादर करण्यात आले
आहे.