पुणे : थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये पब वाटणार कंडोम आणि ORS, प्रकरण पोहोचलं पोलिसांपर्यंत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:08 IST2024-12-30T17:07:40+5:302024-12-30T17:08:14+5:30
नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त पुण्यातील एका पबमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली असून, या पार्टीत कंडोम आणि ओआरएसची पाकिटे वाटली जाणार आहे. हा मुद्दाचा ठरला असून, प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे.

पुणे : थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये पब वाटणार कंडोम आणि ORS, प्रकरण पोहोचलं पोलिसांपर्यंत!
सगळीकडे नव्या वर्षाचा उत्साह दिसत आहे. जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागताचे बेत ठरू लागले आहेत. पुण्यातही एका पबने थर्टी फर्स्ट निमित्त पार्टी आयोजित केली आहे. पण, ही पार्टी वेगळ्याच मुद्द्यामुळे चर्चेत आली आहे. या पार्टीमध्ये पबकडून कंडोम आणि ओआरएस पाकिटे दिली जाणार आहेत. यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आक्षेप घेतला असून, प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचलं आहे.
पुण्यातील मुंढवा येथे रेस्तरा-पब कॅफे आहे. नवीन वर्षानिमित्त या ठिकाणी पार्टी आयोजित करण्यात आली असून, पबकडून पार्टीत आलेल्यांना कंडोम आणि ओआरएस वाटप केले जाणार आहे. पब म्हणण आहे की, मुख्यतः तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे केले जाणार आहे. कंडोमचे वाटप करणे हा काही गुन्हा नाही, असेही पबचे म्हणणे आहे.
दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. पबमध्ये कंडोम आणि ओआरएसचे वाटप करणे, हे पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या शहरात चांगली गोष्ट नाही.
अशा गोष्टींच्या वाटपामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश जाण्याचा धोका आहे. त्यातून वाईट गोष्टींना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, तक्रार मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून पबच्या मॅनेजमेंटची चौकशी केली जाणार आहे.