Pune| रस्ते अपघात टाळण्यासाठी महिन्याला बैठक घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 10:02 AM2022-09-13T10:02:17+5:302022-09-13T10:05:01+5:30
सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस तसेच परिवहन विभाग यांनी दरमहा बैठक घ्यावी....
पुणे : रस्ते अपघातांची कारणे शोधून त्या ठिकाणी भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या मागणीनुसार रस्ता सुरक्षा निधीतून वाहनांचा वेग मोजण्यासाठी २ स्पीडगन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. तसेच यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस तसेच परिवहन विभाग यांनी दरमहा बैठक घ्यावी, असेही त्यांनी सुचविले.
जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, शहर पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे उपस्थित होते. या वेळी गेल्या वर्षात झालेल्या अपघातांचा व त्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम-राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील धोकादायक अपघात ठिकाणांबाबतचा (ब्लॅकस्पॉट) आढावा घेऊन केलेल्या उपाययोजना व त्यानंतर अपघात प्रमाणात झालेली घट याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी अपघात नोंदणी व विश्लेषण प्रणालीबाबत (आयरॅड) सादरीकरण करण्यात आले. देशमुख म्हणाले, ‘आयरॅड’ प्रणालीवर प्रत्येक अपघाताची नोंद होणे अपघातस्थळाची सर्वंकष माहिती होण्यासाठी उपयुक्त आहे. त्यातून संबंधित ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांकडे प्राधान्याने लक्ष केंद्रित करता येऊन भविष्यातील अपघातांना आळा घातला जाऊ शकतो. या ॲपद्वारे माहिती भरणे बंधनकारक असून सर्व संबंधित विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन याची काटेकोर अंमलबजावणी करावी. ‘आयरॅड’वर खासगी रुग्णालयांनी अपघातातील रुग्णांची माहिती भरण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना द्याव्यात.
बैठकीस पीएमआरडीए, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद, पोलीस विभाग, पीएमपीएमएल, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग, शिक्षण, एसटी महामंडळ, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.