पुणे कोरोना 'हॉटस्पॉट', तरी विमान प्रवाशांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 12:05 PM2020-09-22T12:05:45+5:302020-09-22T12:25:47+5:30
ऑगस्टमध्ये १६८४ विमानांमधून सुमारे दीड लाख प्रवाशांनी ये-जा केली. त्यामध्ये येणारे प्रवासी सुमारे ८० हजार एवढे होते.
पुणे : मागील काही महिन्यांपासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असला तरी पुण्यात येणाऱ्यांचा ओघ कमी झालेला नाही. विमानाने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या जाणाऱ्यांच्या तुलनेत अधिक आहे. जुलै महिन्यांपर्यंत हे चित्र अगदी उलट होते. या महिन्यात सुमारे १ लाख १० हजार प्रवाशांपैकी जाणारे प्रवासी सुमारे ६७ हजार एवढे होते. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हे आकडे उलटे झाले आहेत. विशेष म्हणजे ऑगस्टपासून रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे.
लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली विमानसेवा २५ मेपासून काही प्रमाणात पुन्हा सुरू झाली. सुरूवातीला विमान व प्रवासी संख्या अत्यंत मर्यादीत होती. पुणे विमानतळावरून मे महिन्यात दररोज सुमारे ३० याप्रमाणे विमानांची ये-जा सुरू होती. जुुन महिन्यात हा आकडा जवळपास ४५ पर्यंत पोहचला. तर जुलैपासून दररोज ५० ते ६० विमानांची ये-जा सुरू आहे. तसेच प्रवासी संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. पुण्यामध्ये जुलै महिन्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढतोय. त्यानंतर परराज्यातील पुण्यात येणाऱ्या विमान प्रवाशांची संख्याही वाढत चालली आहे. जुलै महिन्यात एकुण १ लाख १० हजार प्रवाशांनी विमानाने ये-जा केली. त्यामध्ये सुमारे ६५ हजार प्रवासी येणार होते. तर जाणाऱ्यांची संख्या जवळपास ६७ हजार एवढी होती. पण ऑगस्ट महिन्यापासून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.
ऑगस्टमध्ये १६८४ विमानांमधून सुमारे दीड लाख प्रवाशांनी ये-जा केली. त्यामध्ये येणारे प्रवासी सुमारे ८० हजार एवढे होते. तर सप्टेंबर महिन्यात १९ तारखेपर्यंत सुमारे १ लाख १८ हजार प्रवाशांपैकी सुमारे ६५ हजार प्रवासी पुण्यात आले आहेत. महिनाअखेरपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
------------------
मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्केच प्रवासी
कोरोना महामारीमुळे सध्या विमान वाहतुकीवर बंधने आहेत. त्यामुळे केवळ प्रमुख शहरांमध्येच विमानसेवा सुरू आहे. परिणामी दरवर्षीच्या सध्या १५ ते २० टक्के प्रवाशांची ये-जा होत आहे. तर विमानांची संख्याही ३० ते ३५ टक्क्यांदरम्यान आहे. दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद, अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, नागपुर आदी प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा सुरू आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात सुमारे ७ लाख २० हजार प्रवाशांनी पुण्यात ये-जा केली होती.
------------
मागील तीन महिन्यांतील ये-जा करणारे प्रवासी
महिना येणारे जाणारे
जुलै ४३,२७७ ६६,७०१
ऑगस्ट ७९,४१५ ७०,१७३
सप्टेंबर ६४,७०५ ५३,३८८
(दि. १९ पर्यंत)
-------------------------------------
एप्रिल ते ऑगस्टपर्यंतची विमान व प्रवासी संख्या
महिना विमानांची ये-जा प्रवासी
एप्रिल ६ १३०
मे २०४ १७,२९५
जुन १३९१ १,१७,५५०
जुलै १४४० १,०९,९७८
ऑगस्ट १६८४ १,४९,५८८