Pune Corona News : अवघ्या दोन आठवड्यात जम्बो @५५० रुग्ण; आणखी क्षमता वाढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 07:46 PM2021-04-05T19:46:15+5:302021-04-05T19:46:25+5:30
दुर्घटना घडू नये याचीही घेतली जातेय खबरदारी...
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत वरदान ठरलेले जम्बो कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात ५५० रुग्णांवर जाऊन पोचले आहे. येत्या दोन दिवसात जम्बोमधील खाटा ६०० पर्यन्त नेण्यात येणार असून हळूहळू पूर्ण क्षमतेने उपचार सुरू केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यवस्थ रूग्णांची संख्या कमी आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. नागरिकांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत याकरिता जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जशी गंभीर परिस्थती निर्माण झाली होती, तशी स्थिती पुन्हा उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे.
गंभीर रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यांच्यावर उपचारांसाठी पालिकेकडून व्यवस्था करण्यात येत आहे. जम्बो सोबतच आणखी चार कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. वैद्यकीय व्यवस्थेचे कामकाज मेडिब्रोस या एजन्सीकडून केले जात आहे. जम्बो रुग्णालय १५ जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ मार्चपासून रुग्णालय सुरू करण्यात आल्यानंतर दोन आठवड्यात येथील रुग्णसंख्या ५५० वर पोचली आहे. मंगळवारी आणखी ५० खाटा वाढविण्यात येणार आहेत. जम्बोमध्ये याठिकाणी एक कार्डिअक आणि साधी अशा दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
-------
जम्बो रुग्णालयासाठी अखंड एसी सुरू ठेवावा लागत आहे. यासोबतच जनरेटरही कायम सुरू असतो. उन्हाचा तडाखा वाढल्याने उष्णता वाढून ही उपकरणे बिघडू नयेत अथवा आगीच्या घटना घडू नयेत याकरिता खबरदारी घेतली जात आहे. याठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांसह एक बंब २४ तास तैनात करण्यात आल्याचे अगरवाल यांनी सांगितले.