Pune Corona News: शहरात कोरोनाचा उद्रेक; रविवारी तब्बल '४ हजारहुन अधिक कोरोनाबाधित'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 07:00 PM2022-01-09T19:00:00+5:302022-01-09T19:00:08+5:30
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झपाट्याने वाढत आहे
पुणे : शहरात रविवारी रुग्णसंख्येचा उद्रेक पहायला मिळाला. रविवारी शहरात १८ हजार ०१२ चाचण्या झाल्या. त्यापैकी ४०२९ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८९० इतकी झाली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, रविवारी ६८८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या १३४ रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. तर, ३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात ५.४८ टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये, ९४.५२ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. शहरात ३९८३ ऑक्सिजन बेड, तर ५२६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. रविवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झपाट्याने वाढत आहे. एका दिवसात तबबल १५०० रुग्णांची वाढ झाली. रुग्णसंख्या कितीतरी पटींनी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५.४३ टक्के आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटायरझरचा वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.
तिसऱ्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्येचा उच्चांक गाठण्याची शक्यता
शहरात ८ महिन्यांनी रुग्णसंख्येने ४००० चा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी २ मे रोजी शहरात ४०४४ इतक्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले होते. त्यावेळी १६ हजार ६१० कोरोना चाचण्या झाल्या होत्या. सक्रिय रुग्णसंख्या ४२ हजार २२९ इतकी होती. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट २८ ते ३० टक्क्यांवर पोहोचेल आणि त्यानंतर साथ ओसरू लागेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.