कोरोना पॉझिटिव्ह महिलेला उपचाराच्या प्रतीक्षेत 'जम्बो'बाहेर फूटपाथवर झोपण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 01:07 PM2021-04-08T13:07:38+5:302021-04-08T15:48:28+5:30
पुण्यात कोरोना रुग्णांना उपचार मिळण्यात येताहेत अडचणी....
प्राची कुलकर्णी -
पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे.त्यातच शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयात कोरोना बाधितांना उपचार मिळण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महिलेला उपचाराच्या प्रतीक्षा करताना फुटपाथवर झोपण्याची वेळ आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वास्तव्याला असणाऱ्या या महिलेची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर तिने उपचारासाठी महापालिकेचे जम्बो रुग्णालय गाठले. तिथे आल्यावर या महिलेला श्वास घेण्यातखूप अडथळा येऊ लागला.तातडीने उपचाराची आवश्यकता असताना तिला व्हीलचेअर नाही म्हणून थांबण्यास सांगितले. मात्र त्रास असहाय्य झाल्यामुळे ती रस्त्यावरच्या फुटपाथवरच झोपली. परंतु, तिथून तिला उठवण्यात आले. काहीवेळ असाच काढल्यानंतर जम्बो रुग्णालय प्रशासनाने थोड्यावेळापूर्वी या महिलेला व्हीलचेअर उपलब्ध करून देत उपचारासाठी आत नेले आहे.
महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करत निर्मिती करण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलसमोर रुग्णांना उपचार मिळण्यासाठी रोज अशी प्रतीक्षा करत ताटकळत उभे राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पुणे शहरात कोरोनाबाधितांना ताबडतोब उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे.मात्र, तरीदेखील रुग्णांना उपचार मिळविताना मोठी हेळसांड होत असून काही कोरोना बाधितांचा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीव देखील गमवावा लागला आहे.
..........
पुणे महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून तिथून कोरोनाबाधित रुग्णांनी जम्बो हॉस्पिटलमध्ये येणे अपेक्षित आहे. मात्र तसे न होता रुग्ण उपचारासाठी थेट जम्बोकडे येत आहे. त्यामुळे हा सर्व गोंधक उडतो आहे. दोन तीन दिवसांच्या कालावधीत असे प्रकार घडत आहे. मात्र, हेल्पलाईन क्रमांकाद्वारे ज्यावेळी रुग्ण येथे दाखल होतात त्यावेळी आम्ही त्यांची पूर्ण व्यवस्था केली जाते.त्यामुळे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी हेल्पलाईन क्रमांकाचा आधार घेऊन जम्बोत यावे.
- डॉ. श्रीयांश कपाले, डीन , जम्बो हॉस्पिटल.