पुणे महानगरपालिकेतील भाजपा नगरसेवक घेणार पुरग्रस्त गाव दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:39 PM2019-08-22T12:39:46+5:302019-08-22T12:41:33+5:30
भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एका महिन्याचे मानधन पुरग्रस्त निधीला दिले आहे.
पुणे: कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातही महापुराने असाधारण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या मदतीत शहर भारतीय जनता पार्टी कुठेही कमी पडणार नाही. पुरग्रस्त भागातील एक किंवा दोन गावे भाजपाचे पुण्यातील नगरसेवक दत्तक घेतील अशी ग्वाही भाजपाच्या शहर शाखेने पक्षाच्या पुरग्रस्त सहायता समितीचे संयोजक रघुनाथ कुलकर्णी यांना दिली.
भाजपाच्या वतीने राज्यस्तरावर या समितीची स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून पुरग्रस्त भागासाठी विविध प्रकारचे मदतकार्य उभे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुलकर्णी यांनी शहरातील भाजपा लोकप्रतिनिधी तसेच कार्यकारिणीची बैठक बुधवारी सकाळी घेतली. शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ अध्यक्षस्थानी होत्या. महापौर मुक्ता टिळक, आमदार दिलीप कांबळे, भीमराव तापकीर, विजय काळे, जगदीश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, इतर मागासवर्गीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विकास रासकर, शहर सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, गणेश घोष बैठकीला उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, आर्थिक मदतीबरोबर पुनर्वसनाच्या कामासाठी श्रमदानाचीही गरज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. शहराध्यक्ष मिसाळ यांनी शहर भाजपाच्या वतीने मदतकार्यासाठी संपुर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एका महिन्याचे मानधन पुरग्रस्त निधीला दिले आहे. प्रभागस्तरीय निधीतूनही प्रत्येकी एक लाख रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार असल्याचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. नगरसेवकांच्या माध्यमातून एक किंवा दोन गावे दत्तक घेऊ असे ते म्हणाले. मिसाळ यांनी प्रास्तविक केले. प्रदेश चिटणीस धीरज घाटे यांनी सुत्रसंचालन केले.
........
आमदार मिसाळ यांनी कुलकर्णी यांच्याकडे शहर भाजपाच्या वतीने नगरसेवकांच्या मासिक मानधनाचा २५ लाख रूपयांचा धनादेश सुपूर्त केला. आमदार मुळीक यांनी वैयक्तिक दीड लाख रुपए तसेच विकास रासकर यांनी १ लाख रूपयांचा धनादेश कुलकर्णी यांच्याकडे दिला.