पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांना आले राष्ट्रभक्तीचे भरते !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 07:39 PM2019-12-10T19:39:18+5:302019-12-10T19:47:55+5:30
तब्बल २ कोटी १६ लाख ८८ हजार रूपये खर्च होणार
पुणे : शनिवारवाडा व कात्रज या दोन ठिकाणी गगनचुंबी राष्ट्रध्वज असताना, असेच राष्ट्रध्वज आपल्याही प्रभागात असावेत या 'राष्ट्रभक्ती'तून तीन नगरसेवकांना जाग आल्याने असे राष्ट्रध्वज उभारणीचे प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीकडे सादर केले़. विशेष म्हणजे त्यांच्या या ध्वज उभारणी करून दाखविण्यात येणाऱ्या'राष्ट्रभक्ती'ला मंजूरी मिळाली असून, यावर पालिकेचे आता तब्बल २ कोटी १६ लाख ८८ हजार रूपये खर्च होणार आहेत़.
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीची बैठकीत सदर तीन प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली़. सुनील कांबळे हे आमदारपदी निवडून आल्याने त्यांची समिती अध्यक्ष कार्यकालातील आजची शेवटची बैठक होती़. या बैठकीत त्यांनी जाताना या नगरसेवकांच्या राष्ट्रभक्तीला अनुमोदन देत हे कोट्यावधींचे प्रस्ताव मंजूर केले़. महत्वाची बाब म्हणजे समान उंचीचे, एकाच पध्दतीने उभारण्यात येणाऱ्या या तीनही राष्ट्रध्वजांसाठी तीन ठेकेदारांनी वेगवेगळ्या दराच्या निविदा सादर केल्या आहेत़. परंतू एकाच पध्दतीच्या कामासाठी ८४ लाख, ७७ लाख व ५५ लाख असे दर आले असतानाही, पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीने यावर कुठलाही आक्षेप न घेता त्यास लागलीच मंजूरी देऊ केली़.
४५ मीटर उंचींचे राष्ट्रध्वज उभारणीसाठी, येरवडा येथील नगरसेवक संजय भोसले यांच्या प्रभाग क्रमांक ‘६ ड’ मधील चिमा गार्डनमध्ये ८४ लाख ९६ हजार रूपये खर्चास, वडगाव शेरी येथील नगरसेवक योगेश मुळीक यांच्या प्रभाग क्रमांक ‘५ क’ मधील राजा छत्रपती शिवाजी उद्यानामध्ये ७७ लाख ६१ हजार रूपये खर्चास तसेच वारजे माळवाडी येथील नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रभाग क्रमांक ‘३२ ड’ मधील ज्ञानेश्वरी उद्यानाजवळ उभारण्यात येणाऱ्या क्रीडांगण परिसरात ५५ लाख १ हजार रूपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे़.
फ्लॅग कोड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहेत़. यामध्ये ४५ मीटर उंचीचा फ्लॅग मास्ट, यु़पी़एस़, राष्ट्रध्वज वर खाली करण्यासाठी आवश्यक असणारी मोटाराईज्ड कंट्रोल सिस्टिम, आवश्यक असणारे फाऊंडेशन, २४ बाय ३६ फुट आकाराचा राष्ट्रध्वज व ३५० वॅट क्षमतेचे फ्लडलाईटस् याचबरोबर या सर्व उभारणीवर दिवसरात्र लक्ष ठेवण्यासाठी सी़सी़टी़व्ही यंत्रणाही उभारण्यात येणार आहे़.