राजकीय सभांसाठी पालिकेने निश्चित केली ‘१३६’ ठिकाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 07:27 PM2019-10-07T19:27:33+5:302019-10-07T19:37:34+5:30
पुण्यात कुठे कुठे होणार आहे सभा .. सविस्तर वाचा
पुणे : विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये राजकीय सभा घेण्यासाठी जागा आणि मोकळ्या मैदानांची उपलब्धता हा मोठा प्रश्न राजकीय पक्षांसमोर आहे. मध्यवर्ती पेठांमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि गैरसोय पाहता प्रशासनाने उपनगर व शहरातील १३६ ठिकाणांची यादी तयार केली आहे. यामध्ये सदाशिव पेठेतील केवळ एका जागेचा समावेश असून सर्वाधिक जागा या बालेवाडी भागातील आहेत. यामध्ये अॅमेनिटी स्पेससह, शाळा, खेळाच्या मैदानांसह मोकळ्या जागांचा समावेश आहे.
निवडणुकांच्या काळामध्ये राजकीय सभांसाठी मैदाने उपलब्ध होण्यामध्ये विविध पक्षांसमोर अडचणी उभ्या राहात असून नेमक्या कुठे सभा घ्यायच्या असा प्रश्न निर्माण होतो. विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसभा, मेळावे आणि कोपरासभा घेण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांपुढे जागांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकांच्या काळात यावरुन प्रशासन आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे महापालिकेने राजकीय प्रचारसभांसह मेळावे आणि कोपरा सभांसाठी तब्बल १३६ जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपनगरांमधील जागांचा समावेश आहे. मात्र, शहराच्या मध्यवस्तीतील शिवाजीनगर आणि सदाशिव पेठ वगळता अन्य कोणत्याही भागाचा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जागा पालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत. या जागांमध्ये सर्वात छोटे मैदान बालेवाडी येथील २५० चौरस मीटरचे आहे. तर सर्वात मोठे मैदान खराडी येथील असून त्याचे क्षेत्रफळ २४ हजार ३९६ चौरस मीटरचे आहे. त्यामुळे या मैदानांवर काही हजारांच्याच सभा होऊ शकतील. मोठ्या नेत्यांच्या भव्य सभा घेण्यासाठी आणखी मोठ्या मैदानाची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. अशा वेळी विविध शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांच्या मैदानांचा विचार होऊ शकतो. पालिकेच्या मालकीच्या जागा सभेसाठी देताना रेडीरेकरनरच्या दरानुसार भाडे आकारणी केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पालिकेने जी मैदाने उपलब्ध करुन दिलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पालिकेच्या शाळांच्या मैदानांचा समावेश आहे. यासोबतच अॅमेनिटी स्पेस तसेच वेगवेगळया आरक्षणापोटी पालिकेच्या ताब्यात आलेल्या रिकाम्या जागांचा समावेश आहे. या सर्व जागा पालिकेच्या जागा वाटप नियमावली २००९ नुसारच भाडे तत्वावर देण्यात येणार असल्याचे भूसंपादन विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
=====
==जागानिहाय आकडेवारी==
भाग एकूण उपलब्ध जागा
आंबेगाव बु - 11 बावधन खु - 03
बालेवाडी - 33 बाणेर - 07
धायरी - 06 हडपसर - 27
कोंढवा - 13 खराडी - 01
महंमदवाडी - 10 पाषण - 06
वडगाव शेरी - 01 वारजे - 04
येरवडा - 01 कात्रज - 02
धनकवडी - 01 सदाशिव पेठ - 0
खराडी - 01 शिवाजीनगर - 02
वडगाव बु. - 06
एकूण - 136