आठवडे बाजारांचा उठणार ‘बाजार’ : महापालिका करणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:06 IST2020-01-30T21:03:35+5:302020-01-30T21:06:06+5:30
शहरात सुरु असलेल्या विनापरवाना आणि अनधिकृत आठवडे बाजारांवर महापालिकेकडून कारवाई करणार

आठवडे बाजारांचा उठणार ‘बाजार’ : महापालिका करणार कारवाई
पुणे : शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळावी तसेच थेट ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळावा याकरिता सुरु केलेल्या आठवडे बाजाराचाच ‘बाजार’ उठण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शहरात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या विनापरवाना आणि अनधिकृत आठवडे बाजारांवर महापालिकेकडून कारवाई करणार आहे.
शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरे आणि पेठांमध्येही जागोजाग आठवडे बाजार भरविले जात आहेत. या आठवडी बाजारामध्ये ठेवण्यात येत असलेल्या भाजीपाल्यासह शेतमालाला ग्राहकांकडून प्रतिसादही दिला जातो. वाढत्या प्रतिसादामुळे आठवडी बाजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. महापालिकेच्या मिळकतींसह रस्त्यावरही विनापरवाना हे बाजार भरु लागले आहेत. हे बाजार त्वरीत बंद करण्यात यावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
राज्य कृषी महामंडळाच्या परवानगीने आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात येते. मंडळाने नुकतेच महापालिकेला यासंदर्भात पत्र पाठविले असून पालिकेच्या मिळकती आणि रस्त्यांवर सुरु असलेल्या अनधिकृत आठवडे बाजारांना परवानगी दिलेली नसल्याचे कळविले आहे. यासोबतच या अनधिकृत आठवडे बाजारांवर कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे पत्रामध्ये नमूद केले आहे. या पत्राच्या अनुषंगाने पालिकेने या आठवडी बाजारांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
पालिकेच्या मिळकतींसह रस्त्यांवर भरणाऱ्या अनधिकृत आठवडे बाजारांमुळे होणारी वाहतूक कोंडी, बाजाराच्या ठिकाणी होणारी अस्वच्छता, कचरा न उचलणे असे प्रकार घडतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेकडे अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ज्या आठवडे बाजारांना परवानगी दिलेली नाही अशा बाजारांवर कारवाई केली जाणार आहे. रितसर परवानगी घेऊन तसेच योग्य नियोजन केलेल्या आठवडे बाजारांबाबत पालिकाच नियोजन करणार आहे. अनधिकृत बाजारांवर येत्या सात दिवसात कारवाई सुरु करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
=======
कारवाई होणार का ?
शहरात बहुतांश ठिकाणी आयोजित केल्या जाणाºया आठवडे बाजारांना राजकीय वरदहस्त असल्याचे चित्र आहे. विविध राजकीय पक्ष अथवा लोकप्रतिनिधींकडूनच या बाजाराचे आयोजन केले जाते. त्यासाठी महापालिकेच्या मोकळ्या जागांसह काही ठिकाणी शाळांच्या मैदानांचाही वापर केला जात आहे. अशा राजकीय वरदहस्त लाभलेल्या आठवडे बाजारांवर कारवाई होणार का असा प्रश्न आहे.