पुणे महापालिकेकडून पाणी मीटर उत्पादक कंपनीला " डच्चू " देण्याचा विचार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:08 PM2019-05-18T12:08:24+5:302019-05-18T12:15:37+5:30
महापालिकेच्या महत्वाकांक्षी २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी बसविण्यात येणारे पाणी मीटरची उत्पादक कंपनी बदलण्याचा विचार सुरु झाला आहे.
पुणे : महापालिकेच्या महत्वाकांक्षी २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी बसविण्यात येणारे पाणी मीटरची उत्पादक कंपनी बदलण्याचा विचार सुरु झाला आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे मीटरचे रिडींग घेता येत नसल्याचे कारण यासाठी समोर आले आहे. गेल्याच महिन्यात ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने मीटर बसविल्याची तक्रार कंपनीने केली होती.
महापालिकेचे मोठे प्रकल्प आचारसंहितेमुळे थंडावले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या प्रकल्पांना गती देण्यात येईल. त्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये २४ तास पाणी पुरवठा, जायका प्रकल्प, नदी काठ सुधारणा प्रकल्प, एचसीएमटीआर या प्रकल्पांविषयी सविस्तर चर्चा झाली.
धिम्या गतीने सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने करणे आवश्यक आहे. आतापर्यंत १५० किलोमीटरचे काम होणे अपेक्षित होते. परंतू, प्रत्यक्षात २० किलोमीटरचेच काम पूर्णत्वास गेले आहे. कामाची ही गती राहिल्यास प्रकल्प लांबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढविणे आवश्यक असल्याची चर्चा बैठकीमध्ये झाली. या योजनेनुसार व्यावसायिक व घरगुती पाणी मिटर बसविण्यात येणार आहेत. परंतू, हे मीटर चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आल्याने काही अडचणी निर्माण झाल्याचे सांगत राजकीय पदाधिकारी मीटर उत्पादक कंपनी बदलण्याची मागणी करीत आहेत. तर प्रशासनाने योजनेच्या या टप्प्यावर कंपनी बदलणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
====
शहरामधून प्रस्तावित करण्यात आलेल्या एचसीएमटीआर या रस्ते प्रकल्पासाठी प्रशासनाची तयारी सुरु असून या बैठकीमध्ये त्याविषयीही चर्चा करण्यात आली. बँकाकडून घ्यावे लागणारे कर्ज, सरचार्ज अथवा जाहिरातमधून उत्पन्न अशा विविध पर्यांयाचा रस्ते विकासासाठी विचार सुरु आहे. काही दिवसात या प्रकल्पाचे काम सुरु होण्याची शक्यता आहे. यासोबतच बैठकीमध्ये नदीकाठ सुधारणा प्रकल्पाबाबतही चर्चा झाली असून जलसंपदा विभागाची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.