Video: पुण्यात नगरसेवकाची 'यमराजा'च्या वेशात एन्ट्री; पथनाट्यातून कोरोनाविषयी नागरिकांची केली जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:36 AM2021-04-29T11:36:27+5:302021-04-29T12:22:23+5:30
कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असताना देखील नागरिकांमधली बेपर्वाई कमी होत नाही म्हटल्यावर थेट यमराजांना अवतरावे लागले.
पुणे : पुणे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.तसेच रुग्णालयात देखील रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे भयाण वास्तव आहे.तरीदेखील नागरिकांना या परिस्थितीचे गांभीर्य नसून निर्बंधांचे उल्लंघन करत ते घराबाहेर पडत आहे. पोलिसांच्या कारवाईची लोकांना भीती राहिली नाही की काय असेच दिसते आहे. त्यामुळे पुण्यात चक्क यमराज अवतरले आणि मग काय त्यांनीच कोरोना जनजागृतीचे काम हाती घेतले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. त्याच बरोबर सामाजिक संस्था, कार्यकर्ते देखील यात पुढाकार घेत आहे. पण खराडी परिसरातील महापालिका नगरसेवकाने सुद्धा नागरिकांमध्ये कोरोना जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.
खराडी आणि परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत देखील नागरिक काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी साक्षात यमराजाचा वेष परिधान करून जनजागृती केली.
खराडी चंदननगर भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यावर उपाय म्हणून अनेक कारवाई देखील केली जात आहे. तसेच कोरोनाच्या संकटाची माहिती अधिक प्रकर्षाने व्हावी यासाठी पथनाट्यातून जनजागृती करण्याची वेळ आली आहे, असे भैय्यासाहेब जाधव यांनी सांगितले. यमराजाच्या सोबत चित्रगुप्ताच्या वेशात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण खैरे यांनी जनजागृती केली. युवक उपाध्यक्ष सुहास तळेकर, सागर धाराशिवकर यांनी देखील सहभाग घेतला.
पुण्यात नगरसेवकाची 'यमराजा'च्या वेशात एन्ट्री; पथनाट्यातून कोरोनाबाबत जनजागृती pic.twitter.com/qC3TGDMgu3
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2021
जाधव म्हणाले, प्रशासनाकडून सांगण्यात आलेले नियम पाळले नाहीत तर नक्कीच यमसदनी जाण्याची तयारी करीत आहोत, अशाप्रकारच्या नाट्यमय जनजागृतीतून नागरिकांना सावधान केले जात आहे. काही नागरिक लॉकडाऊन असताना देखील परिसरात फिरताना आढळतात. मास्क चा वापर, सोशल डिस्टंसिंग, विनाकारण घराबाहेर फिरणे, सॅनिटायझर चा वापर अशा अनेक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे. खुळेवाडी भागात कामगार मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, त्या भागात जनजागृती करण्यात आली. तसेच या पथनाट्यातून राजकीय फटकेबाजी देखील केेेली आहे.
१७ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीतील आकडेवारीनुसार
* नगररोड क्षेत्रीय कार्यालय भागातील रुग्ण संख्या
- सरकारी आणि खासगी रुग्णालयातील रुग्ण एकूण संख्या - ४६५४ ,
*गृहविलगीकरणात उपचार घेत असलेले रुग्ण - ३२९०
- सेंटर मध्ये असलेले रुग्ण - १९१
- सरकारी आणि खासगी रुग्णालयातील रुग्ण एकूण- ४४५
कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ७२८