पुण्याला सुसज्ज विमानतळ देऊ शकलो नाही; प्रफुल्ल पटेल यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 09:37 PM2023-03-01T21:37:08+5:302023-03-01T21:37:32+5:30
पुणे शहर हे महाराष्ट्राला दिशा देणारे शहर असून ते संपूर्ण देशाला देखील दिशा देऊ शकते
पुणे : देशाचा उड्डाण मंत्री असताना पुण्याला सुसज्ज विमानतळ देऊ शकलो नाही. याचं कारण आम्हाला जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. आजही तिचं परिस्थिती असून, शिक्षण, कृषी, रोजगार, विज्ञान- तंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांमध्ये अफाट क्षमता असलेल्या पुण्यात अजूनही विमानतळ होऊ शकले नसल्याची खंत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
पुण्यभूषण फाउंडेशन व पुणेकरांच्या वतीने प्रसिद्ध उद्योजक नितीन देसाई यांना प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शात्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बं देगलूरकर, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, नितीन देसाई यांच्या पत्नी मीना देसाई, सिंबायिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार आणि बांधकाम व्यावसायिक गजेंद्र पवार तसेच माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई उपस्थित होते.
पुणेकरांनी पुढाकार घेऊन पुण्यात अद्ययावत विमानतळ अस्तित्वात येईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा माजी केंद्रिय मंत्री पटेल यांनी व्यक्त केली. पुणे म्हणजे महाराष्ट्राची कला, साहित्य, सांस्कृतिक, औद्योगिक व शैक्षणिक राजधानी आहे. आता राजकारणाची पण झाली आहे. समजले ना काय म्हणायचे आहे असा हळूच चिमटाही प्रफुल्ल पटेल यांनी काढला. पुण्याचे भौगोलिक स्थान आणि पुण्यातील वातावरण सर्वार्थाने पोषक आहे. आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बंगळुरू या शहराला देखील मागे टाकेल, एवढे बुद्धिजीवी लोक आणि माहिती-तंत्रज्ञान उद्योग पुण्यात आहेत. प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकत असताना, त्याचा लाभ पुणेकरांनी घेतला पाहिजे. पुणे शहर हे महाराष्ट्राला दिशा देणारे शहर असून ते संपूर्ण देशाला देखील दिशा देऊ शकते. सरकार कोणाचेही असले तरी, सरकार प्रत्येकाला नोकरी देऊ शकेल, अशी शक्यता फार कमी असल्याने युवकांनी उद्योगांकडे वळले पाहिजे असेही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना नितीन देसाई यांनी एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, दिशा, जनसेवा फाउंडेशन आदी संस्थांच्या माध्यमातून मी जे सामाजिक कार्य करीत आहे आणि या कार्यात मला ज्यांचा हातभार लागत आहे, त्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारत असल्याची भावना व्यक्त केली. सामाजिक कार्यात आलेले सुंदर अनुभवही त्यांनी कथन केले. ते पुढे म्हणाले, दातृत्व केवळ श्रीमंतांकडेच असते, हा समज खोटा ठरवत गरिबातील गरीब माणसाने माझ्या सामाजिक कामात दहा रूपयांचे योगदान दिलेले आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना नेहमी असे म्हणावेसे वाटते की, माझ्यातील सर्व चांगल्या गोष्टी मला समाजाला द्यायच्या असून, त्यातील कोणतीच गोष्ट माझ्याकडे शिल्लक राहू नये आणि शेवटी मी माझे सगळे समाजालाच अर्पण करावे. रित्या मनोवृत्तीने मी समर्पित व्हावे.
सध्या कोणत्याही गुजरातीला हिशोब विचारू नका
गुजराती व्यक्ती कधी हिशोब देत नाही असे नितीन देसाई यांनी मिश्कीलपणे सांगितले. तो धागा पकडत सध्या कोणत्याही गुजरातीला हिशोब विचारू नका अशी कोपरखळी प्रफुल्ल पटेल यांनी मारताच सभागृहात हशा पिकला.