पुणे न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून होणार सुरु ; पण 'या' नियमांचे पालन असणार बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 12:11 PM2021-01-09T12:11:05+5:302021-01-09T12:11:34+5:30
येत्या सोमवारपासून दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू राहणार आहे.
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्याच धर्तीवर मागील काही महिन्यांपासून पुण्यातील न्यायालयीन कामकाज देखील महत्वपूर्ण आणि जलदगती खटल्यांपुरतेच सुरू होते. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्व समाजजीवन व सरकारी कामकाज पूर्वपदावर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून सकाळी 11 ते दीड आणि दुपारी 2 ते 4.30 पर्यंत सुरू राहणार आहे.
मुंबईमध्ये उच्च न्यायालय व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कामकाज नियमितपणे सुरुवात करण्याबाबत उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. येत्या सोमवारपासून नियोजित वेळेनुसार दोन पद्धतीत कामकाज सुरू राहणार आहे. मात्र या दरम्यान कोरोनासंबंधी काळजी घेण्याबाबत न्यायालयात काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
उच्च न्यायालयाच्या या सकारात्मक पावलामुळे न्यायालयातील प्रलंबित खटले मार्गी लावण्यास नक्कीच मदत होणार आहे. तसेच प्रत्येक शिफ्टमध्ये न्यायाधीश व कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक राहणार आहे.तसेच उपस्थिती अनिवार्य असणार्यांनाच न्यायालय परिसरात प्रवेश मिळणार असून काम संपल्यानंतर तात्काळ बाहेर पडणे बंधनकारक राहणार आहे.