पुणे : भिशीच्या पैशांमुळे गेला जीव, दोघांनी केली चुलत भावाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 10:37 AM2018-07-31T10:37:39+5:302018-07-31T10:44:32+5:30
भिशीच्या पैशावरुन झालेल्या वादातून दोन जणांनी मिळून आपल्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रज येथे घडली आहे.
पुणे : भिशीच्या पैशावरुन झालेल्या वादातून दोन जणांनी मिळून आपल्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रज येथे घडली आहे. चंदर मुडावत (वय ३० वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. कात्रजमधील साईनगर येथील चंदरच्या राहत्या घरात त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी रामू नायक मुडावत आणि दशरथ नायक मुडावत या दोघांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (30 जुलै) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदर व रामू मुडावत हे चुलत भाऊ असून ते फरशी बनवण्याचे काम करतात. चुलत भावांमध्ये भिशीच्या पैशावरुन वाद झाला होता. यापूर्वी भांडणेही झाली होती. याचा राग रामू व दशरथ यांच्या मनात होता. सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास चंदर पत्नी व बहिणीसह जेवण करीत होता.
यावेळी रामू आणि दशरथ तेथे आले. त्यांनी आपल्याकडील हत्याराने चंदरवर सपासप वार केले. त्यात चंदरचा जागीच मृत्यू झाला. आरडाओरड झाल्याने बाजूच्या नागरिकांनी दोघांपैकी एकाला पकडून ठेवले. तर दुस-याने घाबरुन पोलीस चौकी गाठली व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. यांनतर भारती विद्यापीठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली.