“राहुल सोलापूरकरांच्या व्हिडिओतून गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही”; पुणे पोलिसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 20:32 IST2025-02-12T20:28:49+5:302025-02-12T20:32:08+5:30
पुणे पोलीस आयुक्तांनी राहुल सोलापूरकर यांच्या या दोन व्हिडीओंबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

“राहुल सोलापूरकरांच्या व्हिडिओतून गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही”; पुणे पोलिसांची माहिती
Rahul Solapukar: सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत होता. हा वाद सुरु असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे राज्यातील विविध संघटनांनी आक्रमक होत त्यांच्या घराबाहेर आंदोलन सुरु केलं होतं. राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती. मात्र आता पुणेपोलिसांनी राहुल सोलापूरकर यांच्या या दोन व्हिडीओंबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. सोलापूरकर यांनी केलेल्या विधानावरुन सर्वच स्तरावरुन त्यांचा निषेध नोंदवण्यात येत होता. त्यानंतर राहुल सोलापूरकरांनी माफी देखील मागितली होती. त्यानंतर सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळे विविध संघटना त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे पुणेपोलिसांनी त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. दुसरीकडे एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नसल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटलं.
“राहुल सोलापूरकर यांनी विधान केलेल्या दोन्ही व्हिडिओ क्लिप पोलिसांनी तपासले आहेत. त्यामध्ये गुन्हा दाखल करावा असे आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही. सध्या त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त दिला आहे, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तो पोलीस बंदोबस्त आहे. राहुल सोलापूरकर यांनी सविस्तर खुलासा पाठवला असून त्याचे अवलोकन करण्यात आले आहे. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही,” असं पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटलं.
“यामध्ये आक्षेपार्ह काही आढळलं तर गुन्हा दाखल होऊ शकतो. पण आतापर्यंत तपासलेल्या व्हिडिओतून गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही. लोकांना कायदेशीर बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असेही अमितेशकुमार यांनी म्हटलं.