धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर पित्यासह शिक्षिकेच्या पतीकडून अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 09:01 AM2024-07-07T09:01:06+5:302024-07-07T09:01:28+5:30
एकटीनेच गाठले पोलिस ठाणे, तुकडे करण्याची दिली धमकी; पाच जण अटकेत
पिंपरी (पुणे) : सोशल मीडियावरील व्हिडीओप्रमाणे शरीरसंबंध करू, असे म्हणून एका नराधमाने १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या शिक्षिकेच्या पतीने व आईच्या मैत्रिणीच्या पतीने व दिराने, तसेच जन्मदात्या पित्याने मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी नराधम पित्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ एप्रिल ते २९ जून २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
याप्रकरणी पीडित मुलीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. समाधान लवटे (४०), प्रताप धायतडे, नितीन हराळे (३२), सागर हराळे (२०) आणि पीडित मुलीचा पित्याविरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३७६ (२) (आय), ३७६ (सी), ३५४, ३५४ (ए), ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२, २१ प्रमाणे गुन्हा दाखल केला. हे आराेपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.
नेमके काय घडले?
पीडित अल्पवयीन मुलगी ही यू-ट्यूबवर व्हिडीओ पाहत होती. त्यावेळी तेथे आलेला समाधान लवटे म्हणाला, मी पण या व्हिडीओप्रमाणे तुझ्यासोबत करतो. त्यानंतर पीडित मुलीला त्याच्या घरी घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराबाबत पीडित मुलीने तिच्या वडिलांना सांगितले.
याबाबत कोणाला काही सांगू नको, आपली इज्जत खराब होईल, असे तिच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी घरात झोपलेली असताना तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी मुलीने विरोध केला असता कोणास काही सांगितले तर तुझे तुकडे करेन, असे धमकावले.
मुलगी ट्यूशनसाठी शिक्षिकेच्या घरी गेली. त्यावेळी घरात कोणी नसताना शिक्षिकेच्या पतीने गैरकृत्य केले. त्यानंतर १९ मे रोजी पीडित मुलीच्या आईच्या मैत्रिणीच्या दिराने गैरकृत्य केले. तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे बोलून जबरदस्ती केली. त्यानंतर २ जून रोजी पीडित मुलगी आईच्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, मैत्रिणीच्या पतीने गैरकृत्य केले. त्यानंतर २९ जून रोजी रात्री वडिलांनी लैंगिक अत्याचार केले.