ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची छापेमारी, कोटींचे घबाड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:18 IST2025-04-03T14:17:18+5:302025-04-03T14:18:56+5:30
ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची छापेमारी, कोटींचे घबाड जप्त
- किरण शिंदे
पुणे - पुण्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. अशात आज ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) या अधिकाऱ्यांच्या घरांवर छापेमारी केली. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जयंत चौधरी यांच्या घरातून ३९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर सुरेश बनवले यांच्या घरातून तब्बल १ कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ACB ला या अधिकाऱ्यांविषयी तक्रारी मिळत होत्या. अशात बुधवारी (२ ता) १ लाख रुपयांची लाच घेताना ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर आज सकाळीच त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या कारवाईने आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ACB कडून पुढील तपास सुरू आहे.