पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 12:54 PM2024-07-06T12:54:10+5:302024-07-06T13:07:14+5:30

Pune Crime : पुण्यात वाहतूक पोलिसांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

Pune Crime attempt to burn traffic police by pouring petrol | पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग

पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात वाहतूकीचे नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह हवालदारावर एकाकडून पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यालाच पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होत असेल तर सामान्यांचे काय असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे.

पुण्यातील लक्ष्मी रोडवरील बुधवार चौकात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणीनगरच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शहरात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह विरोधात कारवाईला सुरु केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही कारवाई सुरु असताना लक्ष्मी रोडवर एका तरुणाला पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्याला कार्यालयात नेले असता त्याने पोलिसांवर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीच्या हातातील लायटर पकडल्याने मोठा अनर्थ टळला.

संजय फकिरा साळवे (रा.पिंपरी चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. लक्ष्मी रोडवरील बुधवार चौकात आरोपी संजय साळवे हा बाईकवरुन जात होता. त्याची वर्तणूक संशयास्पद वाटल्याने कारवाई करणाऱ्या पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर आरोपी काही कारण सांगून बाहेर गेला आणि थोड्यावेळाने हातात पेट्रोलची बॉटल घेऊन आला. आरोपीने पेट्रोल टाकून मारून टाकणार असे म्हणत हवालदार समीर सावंत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक 
शैलजा जानकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर आरोपीने हातातील लायटरने त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला रोखल्याने मोठी दुर्घटना टळली.

"आरोपीला पकडल्यानंतर  ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यासाठी जवळच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यावेळी हवालदारा समीर सावंत हे त्याची तपासणी करत होते. तो गोंधळ घालत असल्याने त्याला थोड्या थांबण्यास सांगितले. त्यादरम्यान तो ऑफिसमध्ये पेट्रोल घेऊन आला आणि हवालदार समीर सावंत यांच्यावर पेट्रोल टाकले. त्यावेळी मीसुद्धा तिथे उभी होते. मी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने मी समीर सावंतला पेट्रोल टाकून जाळून टाकतो असं म्हटलं आणि माझ्या अंगावरही पेट्रोल टाकले. शुक्रवारी संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला," अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांनी दिली.
 

Web Title: Pune Crime attempt to burn traffic police by pouring petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.