Pune Crime: दहा वर्षांपूर्वी वडिलांना मारहाण; आता मुलाच्या खुनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 13:33 IST2023-07-06T13:33:11+5:302023-07-06T13:33:52+5:30
सराईत गुन्हेगार फिरोज मकबूल खान ऊर्फ बब्बाली (वय ४९, रा. एडी कॅम्प चाैक, भवानी पेठ) याला अटक केली आहे...

Pune Crime: दहा वर्षांपूर्वी वडिलांना मारहाण; आता मुलाच्या खुनाचा प्रयत्न
पुणे : दहा वर्षांपूर्वी वाद झाल्याने वडिलांना मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराने तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांच्या घरात शिरून मुलाच्या गळ्यावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सराईत गुन्हेगार फिरोज मकबूल खान ऊर्फ बब्बाली (वय ४९, रा. एडी कॅम्प चाैक, भवानी पेठ) याला अटक केली आहे.
फिरोज खान याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, दहशत पसरविणे असे जवळपास ६० गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर स्थानबद्धतेबरोबर, मोक्का, तडीपार अशा कारवायाही यापूर्वी झाल्या आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून सुटून आला होता.
याबाबत अमन खान (२९, रा. ए. डी. कॅम्प) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता भवानी पेठेत घडली.
फिर्यादी हे घरात दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. अचानक फिरोज खान हा घरात शिरला आणि फिर्यादी यांना शिवीगाळ करू लागला. त्यांनी शिवीगाळ का करतो, असे विचारल्यावर त्याने मी इथला भाई आहे, दहा वर्षांपूर्वी तुझ्या बापाला मारहाण केली होती. आता तुला खल्लास करतो, असे सांगून त्यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तो वार चुकवून फिर्यादी आरडाओरडा करीत घरातून बाहेर पळाले. फिरोज त्यांच्यामागे धावू लागला.
मी इथला भाई आहे, कोणी मध्ये पडले तर त्यांनाही खल्लास करून टाकेल, अशी धमकी देऊन त्याने दहशत निर्माण केली. तेव्हा गल्लीतील लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संजय माळी तपास करीत आहेत.