घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; ८० गॅस टाक्या जप्त, हडपसर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 20:33 IST2025-03-18T20:32:49+5:302025-03-18T20:33:06+5:30
घटनास्थळावरून एक लाखांचा मुद्देमाल जप्त

घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; ८० गॅस टाक्या जप्त, हडपसर पोलिसांची कारवाई
- किरण शिंदे
पुणे – पुण्यातील हडपसर परिसरात अवैधरित्या गॅस विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. एका पत्र्याच्या गाळ्यात अवैधरित्या गॅस सिलेंडरची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील माऊली गॅस एजन्सी, हांडेवाडी रोड येथे एका पत्र्याच्या गाळ्यात एक इसम घरगुती गॅसच्या टाक्यांमधून छोट्या गॅस टाक्यांमध्ये गॅस भरत होता. याबाबत माहिती मिळताच काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने धाड टाकून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी या अवैध व्यवसायावर कारवाई करत आरोपी विकांत राजकुमार जाधव (वय २२) याची चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी ८० गॅस टाक्या, वजन काटा, गॅस ट्रान्सफर पाईप असा एकूण १,३०,४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.