पुणे क्राईम : नववीतील विद्यार्थ्याने रागाच्या भरात वर्गातच काचेच्या तुकड्याने मित्राचा गळा चिरला
By नम्रता फडणीस | Published: November 21, 2024 04:16 PM2024-11-21T16:16:15+5:302024-11-21T16:16:15+5:30
या घटनेत जखमी झालेल्या १५ वर्षीय मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पुणे : मांजरीमधील एका खासगी शाळेच्या वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोन मित्रांमध्ये वाद झाला होता. शाब्दिक वादाचा राग मनातून धरुन नववीतील विद्यार्थ्याने वर्गातच काचेने मित्राचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या १५ वर्षीय मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणात एका १४ वर्षीय मुलाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत जखमी मुलाने विधिसंघर्षित मुलाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगा एका खासगी शाळेत इयत्ता नववी मध्ये शिकत आहे. विधिसंघर्षित मुलगा देखील त्याच वर्गात शिकत आहे. दोघांमध्ये वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वाद झाला होता.
दि. १९ नोव्हेंबर रोजी अडीच वाजता तक्रारदार मुलगा हां वर्गात बसला होता. त्यावेळी विधिसंघर्षित मुलगा त्याच्या पाठीमागून आला आणि त्याने धारदार काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. मुलाच्या या कृत्याने मुलां मध्ये धावपळ उडाली. या घटनेनंतर विधिसंघर्षित मुलाने जखमी मुलाला धमकावत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शिक्षक व कर्मचा-यांनी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विधिसंघर्षित मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश रोकड़े करीत आहेत.