Pune Crime: ड्रग्स तस्कर संदीप धुनिया ‘व्हीपीएन’ने द्यायचा पाेलिसांना चकवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:06 AM2024-02-27T10:06:12+5:302024-02-27T10:06:54+5:30

ओळख लपविण्यासाठी धुनिया आधारकार्ड व अन्य कागदपत्रे खोट्या नावाने तयार करून वावरत असल्याचे तपासांत समोर आले आहे...

Pune Crime: Drug smuggler Sandeep Dhunia tricked the police with 'VPN' | Pune Crime: ड्रग्स तस्कर संदीप धुनिया ‘व्हीपीएन’ने द्यायचा पाेलिसांना चकवा

Pune Crime: ड्रग्स तस्कर संदीप धुनिया ‘व्हीपीएन’ने द्यायचा पाेलिसांना चकवा

पुणे :पोलिस यंत्रणेला सुगावा लागू नये म्हणून पुणे ड्रग्स तस्करीच्या प्रकरणातील मास्टर माईंड संदीप धुनिया हा व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापर करून इतर साथीदारांच्या संपर्कात राहत हाेता. तसेच ओळख लपविण्यासाठी धुनिया आधारकार्ड व अन्य कागदपत्रे खोट्या नावाने तयार करून वावरत असल्याचे तपासांत समोर आले आहे.

गुन्हे शाखेने पुण्यात विश्रांतवाडी, सांगलीत कुपवाडा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून तब्बल ३ हजार ६०० कोटी रुपयांचे एमडी जप्त केले. याप्रकरणी आता पर्यंत पुणे पोलिसांनी १० आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात पुणे पोलिस आणखी सात आरोपींच्या शोधात असून, ब्रिटनचा पासपोर्ट असणारा संदीप धुनिया हा या ड्रग्स प्रकरणातील मास्टर माईंड समजला जात आहे. तसेच अन्य दोन मुख्य आरोपींविरोधात लूक आऊट नोटीस काढली आहे.

महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने (डीआरआय) २०१६ साली संदीप धुनियाला ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. यानंतर जुलै २०२३ मध्ये संदीप धुनियाला २०१६ च्या प्रकरणात जामीन मिळाला होता. बाहेर येताच संदीप एमडीचा फॉर्म्युला देणाऱ्या केमिकल इंजिनिअरचा शोध घेत होता. यावेळी एका मध्यस्थामार्फत डोंबिवली येथील युवराज भुजबळशी त्याचा संपर्क झाला. यानंतर ऑक्टोबर २०२३ पासून कुरकुंभ येथील अर्थ केम या कारखान्यात एमडी बनविण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, ३० जानेवारीला संदीप धुनिया हा नेपाळ मार्गे पळून दुसऱ्या देशात गेला. एमडीच्या निर्मितीपासून वाहतूक आणि वितरण संदर्भात अन्य साथीदारांशी संपर्क करताना पोलिस यंत्रणेला चकवा देण्यासाठी तो व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करीत होता, तर ड्रग्स पेडलर हे व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहत असल्याचे तपासांत समोर आले.

याचबरोबर संदीप धुनिया हा ओळख लपविण्यासाठी खोटे कागदपत्रे वापरत होता. धुनियाने चार आधारकार्ड व अन्य कागदपत्रे बनावट करून वापरत असल्याचेही समोर आले आहे. धुनिया हा ज्याला कोणाला भेटत असे त्याचा फोटो काढायचा आणि त्याचे नकली आधारकार्ड तयार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

व्हीपीएन काय आहे ?

- डेटा लिक न होता पुढच्याशी संपर्क होतो

- तुमचा पत्ता आणि ओळख गोपनीय राहते

- आयपी ॲड्रेस ट्रॅक करता येत नाही

Web Title: Pune Crime: Drug smuggler Sandeep Dhunia tricked the police with 'VPN'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.