Pune Crime: आधी वृद्धाच्या पाया पडले; मग पळविली १० ग्रॅमची अंगठी!
By नितीश गोवंडे | Published: February 2, 2024 06:26 PM2024-02-02T18:26:43+5:302024-02-02T18:27:05+5:30
ही घटना ३० जानेवारी रोजी दुपारी पंचशील चौक, पर्वती दर्शन परिसरात घडली आहे....
पुणे : बँकेत निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या पाया पडून त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या हातातील १० ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लंपास केली. याप्रकरणी, पर्वती दर्शन येथील ८४ वर्षीय ज्येष्ठाने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० जानेवारी रोजी दुपारी पंचशील चौक, पर्वती दर्शन परिसरात घडली आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी केशव सयाजीराव कदम हे रस्त्याने चालत बँकेत निघाले होते. पर्वती दर्शन चौकात आल्यानंतर त्यांना दोन चोरट्यांनी थांबवले. त्यातील एकाने त्यांच्याजवळ येऊन पाया पडून आपली आई वारली आहे, असे सांगितले. मला सुतक असून, आपल्याला आईच्या नावे फुले, हार आणि एक हजार एक रुपये अर्पण करायचे आहेत, असेही म्हटले. त्यानंतर येथील परिसरात मंदिर आहे का? असे ज्येष्ठ नागरिकाला विचारले. त्यानंतर खिशातून पैसे काढत त्याला सोन्याचा स्पर्श करायचा आहे, असे सांगितले. ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेत फसवणूक केली. अधिक तपास उपनिरीक्षक कामठे करत आहेत.