Pune Crime: पुणे शहरात एकाच दिवशी पाच विनयभंगाच्या घटना, गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:51 AM2024-02-16T11:51:53+5:302024-02-16T11:52:21+5:30
हा प्रकार हडपसर येथील डीपी रोडवर १९ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडला....
पुणे : शहरात येरवडा, चंदननगर, कोंढवा आणि हडपसर अशा विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सहा विनयभंगाच्या घटना घडल्या. हडपसर पोलिस ठाण्यात एका १८ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार सागर गायकवाड (२२ रा. साडेसतरानळी, ठाणगे वस्ती, हडपसर) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने वारंवार तरुणीच्या मोबाइलवर फोन केले. तसेच कामावरून घरी जात असताना तिचा पाठलाग करून, हात धरत माझ्यासोबत चल म्हणत विनयभंग केला. हा प्रकार हडपसर येथील डीपी रोडवर १९ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडला.
दुसऱ्या घटनेत, महिलेने उसने दिलेल्या २० लाख ६० हजारांपैकी १६ लाख ४० हजार परत केल्यानंतर उर्वरित पैशांची मागणी केली. याच कारणातून एकाने तिला मेसेज पाठवून शरीर सुखाची मागणी केली. तर दुसऱ्याने तिच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुरेश निगुंडा नाईक (रा. बेळगावी, कर्नाटक) आणि सिद्धार्थ अशोक शिंदे (रा. कृष्णानगर, मोहम्मदवाडी रोड, हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२० ते १० फेब्रुवारी दरम्यान घडला. तसेच नाईक याचा साथीदार सिद्धार्थ शिंदे याने फोन करून तुझी मुलगी कोठे शिकते मला माहिती आहे, तू त्याला पैसे मागू नको, तू जर पोलिसांकडे तक्रार दिली तर आम्ही तुला व तुझ्या मुलीला जगू देणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तिसऱ्या घटनेत घर कामासाठी महिलेला बोलावून घरकामासंदर्भात बोलणी करत असताना अचानक तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार कोंढव्यातील हिल मिस्ट हरमानी येथे १२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला. यावरून आवंत जैकवानी याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
चौथ्या घटनेत ३१ वर्षीय महिलेला व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी विलास सकटे (४०, रा. आनंदनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३ फेब्रुवारी रोजी घडला.
पाचव्या घटनेत महिलेच्या मोबाइलवर ओटीपी पाठवून तिचा मोबाइल हॅक केला. नंतर तिच्या मोबाइलमधील फोटोचा वापर करून मॉर्फ करून अश्लील व्हिडीओ तयार केले. नंतर ते व्हिडीओ तिच्या पतीला पाठवले. या सर्व प्रकार घडल्यानंतर संबंधित २२ वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात संबंधित मोबाइल धारकाविरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ ते ८ फेब्रुवारी दरम्यान घडला.