धक्कादायक...! फेसबुकवर मैत्री, प्रेमात धोका, ३० लाख हडपले; मुंबई-पुणे इथं कारमध्येच गँगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 10:43 IST2025-03-27T10:42:04+5:302025-03-27T10:43:15+5:30

- तरुणीचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ३० लाख रुपये, दोन आयफोन उकळले

pune crime Gang rape of young IT engineer Kandivali incident: Case registered against four | धक्कादायक...! फेसबुकवर मैत्री, प्रेमात धोका, ३० लाख हडपले; मुंबई-पुणे इथं कारमध्येच गँगरेप

धक्कादायक...! फेसबुकवर मैत्री, प्रेमात धोका, ३० लाख हडपले; मुंबई-पुणे इथं कारमध्येच गँगरेप

पुणे : पुण्यातील आयटी अभियंता तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन बलात्कार करत, तिच्यावर आळीपाळीने चौघांनी सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर तरुणीचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ३० लाख रुपये, दोन आयफोन उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही घटना कांदिवली, मुंबई येथील फॅब हॉटेल स्प्रिंगईन, तसेच कारमध्ये घडला. याप्रकरणी, ३३ वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तमीम हरसल्ला खान (रा. कांदिवली) आणि त्याचे अन्य तीन मित्र अशा चौघांच्या विरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, फसवणूक, अपहार, धमकावून मारहाण, अशा भादंविमधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा प्रकार कांदिवली येथे घडला असल्यामुळे गुन्हा पुढील तपासासाठी कांदिवली पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची कर्नाटकातील आहे. आयटी क्षेत्रात नोकरी करत असल्यामुळे ती पुणे शहरात वास्तव्यास आहे. २०२१ मध्ये तिची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी खान याच्या सोबत ओळख झाली होती.

खान याने त्याच्या वडिलांचा मोठा बांधकाम व्यवसाय असून, तो सर्व पाहत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोघांची ओळख वाढत गेली. लग्नाच्या आमिषाने खान याने तरुणीला आपल्या जाळ्यात खेचले. त्यातूनच तरुणी खान याला भेटण्यासाठी कांदिवली येथे गेली होती. येथील फॅब हॉटेलमध्ये दोघे भेटले. त्यावेळी खान याने तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला. खान याने तरुणीला आपल्या कारमध्ये नेऊन मुंबई आणि पुणे येथे बलात्कार केला. खान तरुणीवर कारमध्ये अत्याचार करत असताना, त्याने आपल्या अन्य तिघा मित्रांना बोलावून घेतले. त्या तिघांनी तरुणीवर आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला.

आरोपींनी तरुणीचे अत्याचार करतानाचे काढलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीकडून सुरुवातीला दहा लाख रुपये रोख, तसेच विविध बँकेकडून कर्ज काढून १८ लाख रुपये, असे ३० लाख रुपये उकळले. एवढेच नाही, तर तरुणीच्या क्रेडिट कार्डवरून दोन आयफोन खरेदी केले. दरम्यान, तरुणीने दिलेले पैसे खान याच्याकडे परत मागितले असता, त्याने तरुणीला मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कांदिवली पोलिस करीत आहेत.

Web Title: pune crime Gang rape of young IT engineer Kandivali incident: Case registered against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.