'मी पक्षाचा अध्यक्ष..टी शर्ट काढून मसाज कर नाही तर..' धमकी देणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:08 IST2025-03-11T17:07:11+5:302025-03-11T17:08:01+5:30

- कामगार महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करत व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तिघांना अटक 

pune crime I am the president of a party. Do as I say, or else organization activist arrested for threatening | 'मी पक्षाचा अध्यक्ष..टी शर्ट काढून मसाज कर नाही तर..' धमकी देणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक

'मी पक्षाचा अध्यक्ष..टी शर्ट काढून मसाज कर नाही तर..' धमकी देणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक

- पांडुरंग मरगजे

धनकवडी :  मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे़ तू टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन असे सांगून धनकवडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलेचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी गोळा करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

रोहित गुरुदत्त वाघमारे (वय २९, रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी, सध्या रा. पंचशिल तरुण मंडळ, भिमनगर, उत्तमनगर), शुभम चांगदेव धनवटे (वय २०, रा. गणराज कॉम्प्लेक्स, उत्तमनगर), राहुल ज्ञानेश्वर वाघमारे (वय ३५, रा. एसआरए बिल्डिंग, केळेवाडी, पौड रोड, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ फेब्रुवारी रोजी घडला होता.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित वाघमारे हा एका मित्राला घेऊन धनकवडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने शर्ट काढून खुंटीला टांगून ठेवताना खिशामध्ये मोबाईल चालू ठेवला होता. मसाज करत असताना रोहित वाघमारे याने या महिलेला अंगावरील टॉप काढण्यास सांगितले. त्यांनी त्यास नकार दिल्यावर मी सांगितले तसे केले नाहीस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन, असे सांगून जबरदस्तीने त्यांना टॉप काढायला लावून उपचार करुन घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने २ ते ३ जण तो घेऊन आला. त्याने फिर्यादी महिलेला मसाज करताना नकळत काढलेला व्हिडिओ दाखवून २० हजार रुपये दे, नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर काऊंटरमध्ये असलेले ८०० रुपये जबरदस्तीने घेऊन ते निघून गेले. त्यानंतर भीतीमुळे त्यांनी ही बाब कोणाला सांगितली नाही. महिला आयोगाकडे त्यांनी तक्रार अर्ज केला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण करुन संशयित आरोपींचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेऊन पोलिसांनी तिघांना अटक केली.
 

तिघेही सराईत गुन्हेगार : खंडणी उकळण्याचा त्यांचा धंदा

मसाज पार्लरमध्ये जाऊन नकळत व्हिडिओ काढून खंडणी उकळण्याचा त्यांचा धंदा असल्याचे समोर आले असून, त्यांनी शहरातील वेगवेगळ्या ७ ते ८ ठिकाणी असा प्रकार केल्याची कबुली दिली आहे. रोहित वाघमारे याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तसेच रोहित व शुभम धनवटे यांच्याविरुद्ध बीडमधील अंभोरा पोलीस ठाण्यात तसेच पाथर्डी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हे दाखल आहेत. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Web Title: pune crime I am the president of a party. Do as I say, or else organization activist arrested for threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.