Pune Crime : शहरात चोरीच्या घटनेत वाढ; कात्रज, हडपसरमध्ये भरदिवसा घरफोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 04:06 PM2024-11-22T16:06:16+5:302024-11-22T16:06:16+5:30
हडपसर भागात घराचा दरवाजा उघडा असल्याचा घेतला फायदा
पुणे : दोन दिवसात शहरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या. कात्रज भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा दोन लाख १२ हजार रुपयांचा ऐवज तर मांजरी बुद्रुक हडपसर येथे शेजारी वाढदिवसासाठी कुटुंब गेले असताना घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत ५ लाख ७० हजार रुपये किंमतीचे दागिने ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत अभिजित विठ्ठल झाडे (वय २६, रा. वाघजाईमाता अपार्टमेंट, वाघजाईनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झाडे कुटुंबीय गुरुवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.
मांजरी बुद्रुक हडपसर येथे घरफोडीची दुसरी घटना घडली. दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत घरातील लोक शेजारी वाढदिवस साजरा करायला गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघड़ा असल्याचा फ़ायदा घेत ५ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. याप्रकरणी सचिन टिळेकर ( वय ३४ रा. हडपसर ) यांनी हडपसर् पोलिस ठाण्यात् फिर्याद् दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड पुढील तपास करीत आहेत.