धक्कादायक..! लग्नानंतर १० वर्षांनी झालेल्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून आईचं टोकाचं पाऊल, पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:59 IST2025-04-09T11:58:10+5:302025-04-09T11:59:12+5:30

विवाहानंतर तब्बल १० वर्षांनी मोठा खर्च करून दोन महिन्यांपूर्वी त्यांना जुळी मुले झाली.

pune crime Mother extreme step of drowning her twins born 10 years after marriage in a water tank, but | धक्कादायक..! लग्नानंतर १० वर्षांनी झालेल्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून आईचं टोकाचं पाऊल, पण

धक्कादायक..! लग्नानंतर १० वर्षांनी झालेल्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून आईचं टोकाचं पाऊल, पण

पुणे - कोथरुडमधील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरण अजूनही चर्चेत असतानाच, लोणी काळभोर परिसरातील थेऊर येथील दत्तनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेस्ट ट्यूब बेबीद्वारे जन्मलेल्या दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांची वाढ होत नसल्याने एका निराश आईने त्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.

ही घटना मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या भावाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संबंधित ३५ वर्षीय महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मूळची सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील मिरजवाडीची असून तिचा विवाह एका प्राथमिक शिक्षकाशी झाला आहे. विवाहानंतर तब्बल १० वर्षे अपत्य न झाल्याने दाम्पत्याने टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय निवडला होता. मोठा खर्च करून दोन महिन्यांपूर्वी त्यांना जुळी मुले झाली.

सध्या ती महिला माहेरी दत्तनगरमध्ये राहत होती. मात्र बाळांची वाढ नीट होत नव्हती. त्यातच बाळंतपणामुळे तिची प्रकृतीही खालावली होती. आर्थिक खर्च आणि वाढीव तणाव यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती.

या तणावातूनच मंगळवारी सकाळी तिने दोन्ही बाळांना घेऊन घराच्या छतावर जाऊन टाकीतील पाण्यात बुडवून त्यांचा खून केला आणि स्वतः त्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला वाचवले, मात्र तोपर्यंत दोन्ही बाळांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत.

Web Title: pune crime Mother extreme step of drowning her twins born 10 years after marriage in a water tank, but

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.