'खर्च परवडत नाही..'आईनेच जुळ्या मुलांचा घेतला बळी; लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:22 IST2025-04-10T11:22:22+5:302025-04-10T11:22:58+5:30

पाण्याच्या टाकीत बुडवून दोन चिमुकल्यांना मारले, स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न

pune crime Mother sacrifices her twins because she can't afford treatment | 'खर्च परवडत नाही..'आईनेच जुळ्या मुलांचा घेतला बळी; लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक

'खर्च परवडत नाही..'आईनेच जुळ्या मुलांचा घेतला बळी; लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक

पुणे : लग्नाच्या जवळपास १० वर्षांनी उपचारानंतर घरात टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून चिमुकल्या जुळ्यांचे हसणे-रडणे ऐकायला मिळाले. इतके सगळे करूनही चिमुकल्यांची वाढच होत नाही आणि उपचाराचा खर्चही परवडत नाही म्हणून १० वर्षे मातृत्वासाठी आतुर असलेल्या मायला परिस्थितीने अचानक कैदाशीण बनवले. पोटच्या २ महिन्यांच्या जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारले आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. ८) सकाळी पावणेसातच्या सुमारास महिलेच्या माहेरी थेऊरमधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत घडली.
 
दरम्यान, पैशांअभावी वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून पुण्यात गर्भवती महिलेचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, चिमुकल्यांच्या उपचाराचा खर्च परवडत नाही म्हणून आईने आज दोन चिमुकल्यांचा बळी घेतला. या दोन्ही घटना सरकार आणि समाजाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या असून, आरोग्य सेवेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, याकडे लक्ष वेधणाऱ्या आहेत.



याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (३५, रा. मीरजवाडी, आष्टा, जि. सांगली) या महिलेला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेच्या भावानेच फिर्याद दिली आहे.मुलांची योग्य वाढ होत नसल्याने आणि त्याचा खर्च परवडत नसल्याने घरात ताणतणाव होता. त्यातूनच प्रतिभा मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन घराच्या छतावर गेली. तिने गच्चीवरील प्लास्टिकच्या पाण्याचे टाकीमध्ये दोन्ही बाळांना बुडवले व स्वतः त्यात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार समोरील बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शिवशंकर स्वामी यांनी बघितला.त्यांनी प्रतिभाचा भाऊ प्रल्हाद लक्ष्मण गोंडे यांना फोनद्वारे या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर प्रल्हाद गोंडे यांनी घराच्या छतावर जाऊन प्रतिभा आणि दोन्ही मुलांना पाण्याच्या बाहेर काढले. तोपर्यंत दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षालाही कळवली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रल्हाद गोंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत आरोपी प्रतिभा याला खून केल्याप्रकरणी अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.

जुळ्या मुलांची वाढ योग्य प्रकारे होत नसल्याने, घरात ताणतणाव होता. खर्चदेखील खूप होत असल्याने मानसिक तणावातून आरोपीने हे कृत्य केले. आम्ही आरोपी महिलेला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.
- डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपायुक्त 

Web Title: pune crime Mother sacrifices her twins because she can't afford treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.