Pune Crime: अपहरणानंतर गुन्हेगाराचा खून, मुख्य आरोपीला जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 02:09 PM2024-01-25T14:09:21+5:302024-01-25T14:09:59+5:30
पुणे : सराईत गुन्हेगाराचे अपहरण करून त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करीत खून केला. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन अर्ज ...
पुणे : सराईत गुन्हेगाराचे अपहरण करून त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करीत खून केला. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला. मलिंगा म्हेत्रे असे जामीन मंजूर केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.
पुणे-मुंबई हायवेशेजारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कोथरूड पोलिसांना सापडला हाेता. तपासाअंती हा मृतदेह कोथरूड-वारजे भागातील सराईत गुन्हेगार जगदीश पारधे याचा असल्याचे वारजे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून तपास केला असता घटनेच्या आदल्या दिवशी म्हाडा कॉलनी वारजे येथून जगदीश पारधे याचे त्याच्याच मित्रांनी अपहरण करून त्याला एका आरोपीच्या गाडीमधून कात्रज आंबेगाव भागात नेले. चालत्या गाडीतच तीक्ष्ण हत्यारांनी वार करून, तो मेल्याची खात्री झाल्यावर त्याचा मृतदेह पुणे-मुंबई हायवेनजीक टाकून आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी आरोपींचे मोबाइल लोकेशन, मृत व्यक्तीचे मोबाइल लोकेशन याच्या आधारे सर्व आरोपींना तत्काळ अटक केली होती.
ॲड. शुभांगी परुळेकर यांनी उच्च न्यायालयात आरोपीची बाजू मांडताना, मृत व्यक्ती हा सराईत गुन्हेगार होता. त्याचे कोथरूड-वारजे भागातील इतर व्यक्तींशी शत्रुत्व होते. त्याचप्रमाणे आरोपीचा गुन्हा करण्यामागचा हेतू स्पष्ट होत नाही. अशा महत्त्वाच्या बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.