मुख्य सूत्रधाराला केले जेरबंद, कार्ड क्लोनिंग करून बॅँक खात्यातून रक्कम काढायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:43 AM2018-05-11T03:43:56+5:302018-05-11T03:43:56+5:30
एटीएम कार्डचे क्लोनिंग करून त्याद्वारे नागरिकांच्या बँक खात्यातील रक्कम काढणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यात सायबर क्राईम सेलला यश आहे.
पुणे - एटीएम कार्डचे क्लोनिंग करून त्याद्वारे नागरिकांच्या बँक खात्यातील रक्कम काढणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यात सायबर क्राईम सेलला यश आहे़
यासीर अब्दुल सय्यद (वय ३६, रा़ बेव्हर्ली पार्क, मीरा रोड, ठाणे) असे त्याचे नाव आहे़ सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम सेंटरमध्ये स्किमर बसवून लोकांची माहिती घेऊन त्या आधारे कार्डचे क्लोनिंग करुन वेगवेगळ्या शहरांतून एटीएमद्वारे पैसे काढणाºया या टोळीतील चार जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती़ परंतु, यासीर सय्यद हा मुख्य सूत्रधार गेल्या ७ महिन्यांपासून हुलकाविण्या देत होता़
पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील एटीएम सेंटरमधून पैसे काढल्यानंतर त्या नागरिकांच्या बँक खात्यातून रकमा काढून घेतल्या जात असल्याचे प्रकार उघडकीस आले होते़ याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये आॅक्टोबर २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलिसांनी याप्रकरणी एका नायजेरियनासह ५ जणांना अटक केली होती़ त्यांच्या घरामध्ये कार्ड क्लोनिंगचे साहित्य, स्किमर, पिनहोल कॅमेरा, राऊटर, ब्लॅक कार्ड आढळून आले होते़ मात्र, या टोळीचा मास्टरमार्इंड यासीर हा गेल्या सात महिन्यांपासून फरार होता़
यासीर सय्यद हा मोबाईल बंद करुन घरातून पळून गेला होता़ पुणे सायबर सेल त्याच्या मागावर होते़ पोलिसांनी फेसबुक पेजवरुन त्याचा माग काढत मुंबई येथून त्याला अटक केली़ त्याच्याकडे तपास केला असता त्याने पुणे शहरासह मुंबई, कोलकता आणि दीव दमण येथेही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले़
पोलीस उपायुक्त हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, सहायक निरीक्षक सचिन गवते, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, कर्मचारी किरण अब्दागिरे, आदेश चलवादी, अतुल लोखंडे, दीपक भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शहरातील ११ एटीएममध्ये बसविले होते स्किमर
यासीर सय्यद व त्याच्या टोळीने शहरातील कोरेगाव पार्कसह विविध ठिकाणच्या ११ एटीएम सेंटरमध्ये स्किमर बसविले होते. ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही अशा ठिकाणच्या एटीएमला त्यांनी हे स्किमर बसविले होते़ बँकेच्या ग्राहकांनी त्या एटीएममधून पैसे काढले की त्यांच्या कार्डवरील सर्व माहिती तेथे लावण्यात आलेल्या स्किमरमध्ये समाविष्ट होत असे़
कोरेगाव पार्क, पुणे रेल्वे स्टेशन, मगरपट्टा, अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ अशा ठिकाणच्या एटीएम सेंटरमध्ये त्यांनी स्किमर बसविले होते़ त्यातून त्यांनी १३४ कार्डची माहिती गोळा केली़ त्यापैकी आपल्या खात्यातून पैसे परस्पर पैसे काढून घेतल्याच्या ५० नागरिकांनी तक्रारी सायबर सेलकडे दिल्या होत्या़ त्यातून सुमारे ६० लाख रुपये लांबविण्यात आले होते़ हे पैसे त्यांनी दिल्ली, मुंबई, गुजरात, दमण, कोलकता व अन्य ठिकाणावरील एटीएम सेंटरमधून काढण्यात आले होते़
पाचवी शिकलेला मास्टरमार्इंड
यासीर सय्यद हा केवळ पाचवी शिकलेला असून, तो कुर्ला येथे चाट सेंटर चालवित होता़ कामानिमित्त तो दिल्ली येथे गेल्यानंतर त्याची नायजेरियन नागरिकांशी ओळख झाली़ त्यांनीच यासीरला बनावट एटीएम कार्ड तयार करणे तसेच स्किमर तयार करण्याचे ट्रेनिंग दिले होते़