विद्यार्थिनीने अश्लील व्हिडीओ काढून केले प्राचार्यांना ब्लॅकमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:47 AM2018-06-15T03:47:35+5:302018-06-15T03:47:35+5:30
महत्त्वाचे काम असल्याचे सांगत कॉलेजच्या प्राचार्यांना घरी बोलावून त्यांच्यासोबत जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका माजी विद्यार्थिनीने ९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार शुक्रवारी तळेगावमध्ये उघड झाला आहे.
पुणे - महत्त्वाचे काम असल्याचे सांगत कॉलेजच्या प्राचार्यांना घरी बोलावून त्यांच्यासोबत जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका माजी विद्यार्थिनीने ९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार शुक्रवारी तळेगावमध्ये उघड झाला आहे.
संबंधित विद्यार्थिनीला तिच्या साथीदारासह पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथील एका कॉलेजमध्ये सापळा रचून अटक केली आहे. फिर्यादी प्राचार्य व आरोपी विद्यार्थिनी व तिचा मित्र यांची नावे ग्रामीण पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. मात्र, या दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे तळेगावमधील एका कॉलेजमध्ये प्राचार्य आहेत तर आरोपी मुलगी ही त्या कॉलेजची माजी विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनीने महत्त्वाचे काम असल्याचे सांगत फिर्यादी यांना १ जूनला घरी बोलावले. त्या वेळी तिने मित्राशी संगनमत करून प्राचार्यांना घरात कोंडून मारहाण व शिवीगाळ केली व त्यांना कपडे काढायला भाग पाडले. त्यानंतर विद्यार्थिनीने स्वत:सोबत मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ काढून घेतला.
कॉलेजमध्ये सापळा रचून विद्यार्थिनीसह दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान, खंडणीपोटी घेतलेल्या ९ लाख रुपयांपैकी या दोघांकडून ६ लाख २० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
९ लाख रुपये दिले आरोपीला
संबंधित व्हिडीओ मित्र आणि नातेवाइकांना पाठवून सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. घाबरून गेल्याने फिर्यादी यांनी ३०पैकी ९ लाख रुपये आरोपीला दिले. मात्र उर्वरित २१ लाख रुपये द्यावे म्हणून आरोपी फिर्यादी यांना मारण्याची व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होते. त्यामुळे प्राचार्यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ठरल्याप्रमाणे उर्वरित रक्कम स्वीकारण्यासाठी विद्यार्थिनी व तिचा मित्र शुक्रवारी कॉलेजला येणार असल्याची माहिती प्राचार्यांनी पोलिसांना दिली.